मुलांनो.. थोरा-मोठ्यांच्या वेशभूषेत येऊन जागवा स्मृती.
By Admin | Published: August 11, 2015 12:32 AM2015-08-11T00:32:52+5:302015-08-11T00:51:53+5:30
.. औरंगाबाद : ‘हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के मेरे देश के बच्चो तुम रखना इसे संभालके...’ अशी अपेक्षा देशातील
..
औरंगाबाद : ‘हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के मेरे देश के बच्चो तुम रखना इसे संभालके...’
अशी अपेक्षा देशातील बच्चे कंपनीकडून स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांनी व्यक्त केलीय. देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांची वेशभूषा करून बच्चे कंपनीने ‘ मेरा भारत महान’ या देशभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांना अशी आगळीवेगळी आदरांजली वाहण्याची संधी यानिमित्त शहरातील बालगोपालांना उपलब्ध झाली आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन आपण शनिवारी उत्साहात साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो ज्ञात-अज्ञात शूरवीरांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांनाही यानिमित्ताने लोकमत व प्रोझोन मॉलतर्फे आयोजित ‘मेरा देश महान’ या उपक्रमांतर्गत १ लाख ११ हजार १११ दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात येणार आहे. या मायभूमीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी लाखो देशभक्त कामी आले. स्वातंत्र्य लढ्याची ज्योत कायम धगधगती ठेवणाऱ्या निधड्या छातीच्या वीरांच्या वेशभूषा करून लहान मुले, शालेय विद्यार्थी या देशभक्तीच्या सोहळ्यात सहभागी झाले तर स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती बालमनावर कायमच्या कोरल्या जातील. त्यामुळे मुला-मुलींस देशभक्त, इतिहास पुरुषांच्या वेशभूषेत वेगळेपणे सादर करण्याची पालकांनाही ही एक पर्वणीच आहे.
गतवर्षी स्वातंत्र्य दिनी १ लाख ४ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रोझोन मॉलमध्ये एकत्र येऊन जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडविले. यंदाचा स्वातंत्र्य दिन अधिक संस्मरणीय करण्यासाठी लोकमत आणि प्रोझोन मॉलतर्फे १ लाख ११ हजार १११ मेणबत्त्या लावण्याचे प्रायोजन आहे. यातील एक दिवा आपल्या व आपल्या मुला-मुलींच्या हस्ते प्रज्वलित व्हावा. त्यानिमित्त शनिवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजता प्रोझोन मॉलमध्ये एकत्र येऊन देशभक्तांची वज्रमूठ बांधूया. या सोहळ्याचे सहप्रायोजक ‘रेडिओ मिर्ची ’हे आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश सर्वांनाच खुला आहे.