मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 06:44 PM2022-03-30T18:44:09+5:302022-03-30T18:45:03+5:30
शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत
औरंगाबाद : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आवठड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिक्षण उपसंचालक साबळे यांनी सांगितले की, कोविडमुळे मागील दोन वर्षांत मोजक्याच दिवस शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, नेटवर्कच्या मर्यादेमुळे मुलांपर्यंत पाहिजे तेवढे हे शिक्षण पोहोचले नाही. परिणामी, अनेक शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. ऑक्टोबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या. काही शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, तर काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात खाजगी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे परिपत्रक जारी केले. मात्र, काही पालक, शिक्षकांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला आहे. उन्हाळी सुट्या मे महिन्यापासून सुरू होतील व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.
मग, रिव्हिजन करा
ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, अशा शाळांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुलांची रिव्हिजन घ्यावी व तिसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्राची परीक्षा घ्यावी. ज्या शाळांचा अभ्यासक्रम राहिला असेल, त्या शाळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारीदेखील वर्ग भरवू शकतात. मात्र, हा निर्णय शाळांसाठी बंधनकारक नसून तो ऐच्छिक आहे.
सुटीचा बेत रद्द करण्याची गरज नाही
मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत.