मुले, नातवंडांनी घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करणे कायद्याने बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:04 AM2021-06-20T04:04:41+5:302021-06-20T04:04:41+5:30
औरंगाबाद : घरातील आजी-आजोबा, आई-वडील यांचा मुलांनी, नातवंडांनी सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. ज्येष्ठांची जबाबदारी झटकून चालत नाही. ...
औरंगाबाद : घरातील आजी-आजोबा, आई-वडील यांचा मुलांनी, नातवंडांनी सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. ज्येष्ठांची जबाबदारी झटकून चालत नाही. विविध गुन्ह्यांसाठी कायदे आहेत, त्याबरोबर ज्येष्ठांच्या संरक्षणासाठीही कायद्यात विशेष तरतूद असल्याचे पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या जनजागृती सप्ताहानिमित्त शनिवारी (दि.१९)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि औरंगाबाद फिजिशियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठांसंदर्भातील कायद्यांविषयी पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी विजयपूर (कर्नाटक) येथील बी. एम. पाटील मेडिकल काॅलेजचे डाॅ. आनंद अंबाली यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत होणारे गैरवर्तन म्हणजे काय, याविषयी माहिती दिली. फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. संजय पाटणे म्हणाले, आयुष्यमान वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डाॅ. मंगला बोरकर यांनी वृद्धांची काळजी घेणाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत माहिती दिली. मालती करंदीकर यांनी वृद्धाश्रम काळजी गरज असून, घरच्यासारखे वातावरण निर्माण करून आयुष्य चांगले जगता येईल, असे सांगितले. फिजिशियन असोसिएशनचे सचिव डाॅ. अनंत कुलकर्णी आभार मानले. वार्धक्यशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. शैलजा राव यांनी सूत्रसंचालन केले. वेबिनारसाठी डाॅ. महेश पाटील, डाॅ. आशिष राजन, डाॅ. झेबा फिरदोस, डाॅ. श्रृती कर्णिक, डाॅ. साधन जायभाये, डाॅ. पंकज महाजन, डाॅ. मिलिंद खाडे, डाॅ. केहकशा फारुकी, डाॅ. मोमिन आयेशा यांनी परिश्रम घेतले.