घरातून पळून शिर्डीला निघालेल्या बालकांनी जन्मदात्यांसोबत परत जाण्यास दिला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:11+5:302021-07-11T04:04:11+5:30
औरंगाबाद : आई-वडील मारतात म्हणून तिघा भावंडांनी घरातून पळ काढला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही सोबतीला आला. हे चौघे रेल्वेने शिर्डीकडे ...
औरंगाबाद : आई-वडील मारतात म्हणून तिघा भावंडांनी घरातून पळ काढला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही सोबतीला आला. हे चौघे रेल्वेने शिर्डीकडे निघाले; पण रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीत ही मुले पालकांशिवाय आढळली. चारही मुलांना औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरवून घेत पालकांना माहिती देण्यात आली. धावत-पळत आई-वडील औरंगाबादेत पाेहोचले; परंतु तिघा मुलांनी जन्मदात्यांसोबत परत जाण्यास नकार दिला. त्यामुळे या मुलांना बालकल्याण समितीच्या माध्यमातून बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक के. चंदूलाल यांना गस्तीदरम्यान शुक्रवारी रात्री काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये १० वर्षांचा मुलगा, एक ८ वर्षांची आणि दुसरी १२ वर्षांची मुलगी, असे तिघे भावंडे, तसेच त्यांचा १२ वर्षांचा मित्र प्रवास करताना आढळले. चौघेही राहणारे परळी वैजनाथ येथील असून, चंदूलाल यांनी या चौघांची विचारपूस केली. तेव्हा आई-वडील मारहाण करीत असल्याने आम्ही शिर्डीला चाललो, असे तिघा भावंडांनी सांगितले. त्यांच्यासोबत पालक नसल्याने चौघांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरवून घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. मुले सापडल्याच्या आनंदात तिघा मुलांचे आई-वडिलांनी धावतपळत औरंगाबाद गाठले; परंतु मुलांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.
मुलांच्या जिद्दीपुढे सर्व हतबल
मुलांच्या जिद्दीपुढे आई-वडील आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी हतबल झाले. त्यामुळे यासंदर्भात बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली. त्यानंतर चौघांना बालगृह-निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. चंदूलाल, हेड काॅन्स्टेबल बी. जी. लोणे, काॅन्स्टेबल सरिता मान, छोटी पुनिया, धनेश कुमारी यांनी ही कार्यवाही केली.
-----
फोटो ओळ...
घरातून पळून आलेल्या बालकांसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी.