बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी
By मुजीब देवणीकर | Published: May 30, 2023 07:49 PM2023-05-30T19:49:25+5:302023-05-30T19:50:47+5:30
यासोबतच शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानातही बसविणार आगीनगाडी
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्धार्थ उद्यानात अत्याधुनिक पद्धतीत बॅटरीवर चालणारी रेल्वे बसवली आहे. याचे लवकरच लोकार्पण होईल. त्याचप्रमाणे टी.व्ही. सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातही अशाच पद्धतीची रेल्वे बसविण्यात येणार आहे.
शहरातील सर्वात मोठे उद्यान म्हणजे सिद्धार्थ आहे. या ठिकाणी प्राणिसंग्रहालयही आहे. दररोज ४ ते ५ हजार नागरिक उद्यान, प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. पूर्वी या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी डिझेलवर धावणारी रेल्वे होती. या रेल्वेगाडीचा आवाज बराच येत असत. ज्या ठिकाणी रेल्वे फिरते त्याच्या पाठीमागेच प्राणिसंग्रहालय आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रेल्वेवर आक्षेप घेतला. त्यामुळे चार वर्षांपूर्वी रेल्वे बंद करण्यात आली. बंद असलेली रेल्वे पाहून येणारे नागरिक रेल्वे कधी सुरू होणार, असा प्रश्न उद्यान कर्मचाऱ्यांना करीत होते. शेवटी मनपा प्रशासनाने आवाज न करणारी बॅटरीवर चालणारी रेल्वे आणण्याचा निर्णय घेतला. इच्छुक कंत्राटदाराकडून अर्ज मागविण्यात आले. महापालिकेला २५ टक्के रॉयल्टी देऊन रेल्वे उभारणे, ती चालविण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराने घेतली. रेल्वे बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील आठवड्यात लाेकार्पण करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या रेल्वेत एका चिमुकल्याला २५ रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.
स्वामी विवेकानंद उद्यान
या उद्यानातही संबंधित कंत्राटदाराकडूनच नवीन ई-रेल्वे बसविली जाणार आहे. पुढील महिनाभरात हे काम सुरू होईल. मागील अनेक वर्षांपासून सिडको-हडको भागातील नागरिक उद्यानात रेल्वे बसवा, अशी मागणी करीत आहेत. लवकरच ही मागणी पूर्ण होणार आहे.
९ वर्षांपासून रेल्वे उभी
सिडको एन-८ येथील बॉटनिकल गार्डन येथे जवळपास ३५ ते ४० लाख रुपये खर्च करून २०१३ मध्ये रेल्वे बसविण्यात आली. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून ही रेल्वे बसविण्यात आली होती. महापालिकेने आजपर्यंत ही रेल्वे चालूही केली नाही. कंत्राटदाराला आजपर्यंत या कामाचा एक रुपयाही देण्यात आला नाही. कंत्राटदाराची फाइलच मनपाने गहाळ करून टाकल्याचे कळते.