बाल दिन विशेष : देवा, लॉकडाऊनची मज्जा अशीच कायम राहू दे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:45 PM2020-11-14T12:45:43+5:302020-11-14T12:46:59+5:30
लॉकडाऊन, कोरोनामुळे जगात असंख्य समस्या निर्माण झाल्या असल्या तरी लहानग्यांचे बालपण मात्र लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने बहरले आहे.
औरंगाबाद : ना शाळेत जायचे, ना आधी इतका अभ्यास करायचा. ना कोणती ट्यूशन, ना पाळणाघराची कटकट..दिवसभर घरीच असणारे आई-बाबा आणि लाड पुरविणारे आजी-आजोबा. त्यामुळे देवा, कोरोना कमी होऊ दे, पण लॉकडाऊनची मज्जा कायम राहू दे, अशी अनेक बालगोपाळांची सुप्त इच्छा आहे.
लॉकडाऊन, कोरोनामुळे जगात असंख्य समस्या निर्माण झाल्या असल्या तरी लहानग्यांचे बालपण मात्र लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने बहरले आहे. १४ नोव्हेंबरला बाल दिन तर दरवर्षीच साजरा होतो; पण घरी असणारे आई-बाबा, सोबतीला दिवाळीची रंगत यामुळे यंदाचा बाल दिन लहान मुलांसाठी निश्चितच अधिक आनंददायी आहे. बाल दिनानिमित्त बच्चेकंपनीशी संवाद साधला असता, लॉकडाऊनचा काळ आमच्यासाठी खूप छान होता. त्या काळात जेवढी धमाल आली, तेवढी आम्ही कधीच केली नाही, असे चिमुकल्यांनी आनंदाने बागडत सांगितले.
लहान मुलांच्या बाबतीत लॉकडाऊनने अनेक सकारात्मक बदल आणले आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांनी आणि आम्ही पहिल्यांदाच एवढा वेळ सोबत घालविला. त्यामुळे मुलांच्या नेमक्या गरजा, त्यांच्या अडचणी आम्हाला कळू लागल्या, आमचे नाते एका नव्या पद्धतीने बहरू लागले, नोकरी, व्यवसाय, घरातल्या जबाबदाऱ्या या चक्रात धावताना मुलांचे बालपण नकळत हातून सुटून जात होते, ते आता आम्हाला गवसत आहे, हे अनेक पालकांनी मान्य केले आहे.
आईसोबत करतेय धमाल
आई दिवसभर घरीच असल्याने अत्यंत सुरक्षित वाटते. कोरोना संपला तर आई पुन्हा ऑफिसला जाणार का, अशी चिंता आता ११ वर्षांच्या ऋजुता थोरात हिला वाटते आहे, तर घरी राहिल्यामुळे माझे आणि माझ्या मुलीचे बाँडिंग दिवसेंदिवस वाढते आहे, आमचे अनुकरण करून ती अनेक गोष्टी नकळत शिकते आहे, असे ऋजुताची आई प्रियंका थोरात यांनी सांगितले. प्रियंका या शिक्षिका असल्याने शाळा आणि घर सांभाळताना मुलीला वेळ देणे शक्य व्हायचे नाही, ते लॉकडाऊनने साध्य झाले, असे प्रियंका म्हणाल्या.
मुलांची कौशल्ये विकसित झाली
घरातली सगळी कामे मिळूनमिसळून करायची, सायंकाळची शुभंकरोती, एकमेकांशी संवाद साधायला मिळालेला भरपूर वेळ, घराला सगळ्यांनी मिळून केलेली रंगरंगोटी, ही सगळी कामे लॉकडाऊनमध्ये झाल्याने मुलांची कौशल्ये या काळात खूपच विकसित झाली, असा स्वत:चा अनुभव उद्योजिका प्रतिभा सानप यांनी सांगितला, तर लॉकडाऊनचा काळ आम्ही खूप जास्त मिस करीत आहोत, असे प्रतिभा यांची मुले श्रीया, श्रुती व शिवराज या चिमुकल्यांनी सांगितले.