मुलाचा खून: आई,वडील, भावाला जन्मठेप
By Admin | Published: September 20, 2014 12:31 AM2014-09-20T00:31:22+5:302014-09-20T00:31:46+5:30
मुलाचा खून: आई,वडील, भावाला जन्मठेप
औरंगाबाद : माहेरी निघून गेलेल्या पत्नीला नांदावयास आणून वेगळे राहण्याचा हट्ट धरणाऱ्या स्वत:च्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी त्याचे आई-वडील आणि भावाला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपींना सहा महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही खुनाची घटना २०११ मध्ये करमाडजवळील भांबर्डा येथे घडली होती.
सर्जेराव किसन काळे (६०), फु लाबाई सर्जेराव काळे (५४) आणि मृताचा भाऊ लक्ष्मण सर्जेराव काळे (२२, सर्व रा. भांबर्डा, ता. औरंगाबाद) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आई-वडील आणि भावाचे नाव आहे. मोठा मुलगा ज्ञानेश्वर (२८) याची पत्नी घरगुती कारणावरून माहेरी राहत होती. तिला नांदायला आणून वेगळे राहण्याचा विचार ज्ञानेश्वरने अनेकदा आई, वडील आणि भावाला बोलून दाखविला. त्यासाठी त्याने घर आणि शेताची वाटणी करण्याची मागणी आई-वडिलांकडे केली (पान ७ वर)
(पान १ वरून) होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. ३० जून २०११ रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सर्जेराव यांचा भाऊ भीमराव हे पत्नीसह घरात टी. व्ही. पाहत बसलेले असताना सर्जेरावच्या घरातून वाचवा, वाचवा असा आवाज ऐकू येत असल्याने ते आणि त्यांची पत्नी तिकडे धावले. त्यावेळी सर्जेरावच्या घरासमोर आणि मागील बाजूला गावातील लोक जमा झालेले दिसले. दरवाजा ठोठावून तो उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर काही वेळानंतर तिन्ही आरोपी घरातून बाहेर आले आणि घराला कुलूप लावून निघून जाऊ लागले. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर नसल्याने त्यांना संशय आल्याने उपस्थितांनी त्यांना थांबवून ठेवले. सरपंच बळीराम काळे यांनी करमाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सर्जेराव यांच्या घरात काही तरी अघटित घडले असल्याचे कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्जेरावला दरवाजाचे कुलूप उघडायला लावले. त्यावेळी ज्ञानेश्वर हा पलंगावर मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा आणि कानातून रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. आई-वडील आणि भावानेच ज्ञानेश्वरचा गळा आवळून खून केल्याची तक्रार भीमराव यांनी करमाड ठाण्यात नोंदविली.
सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. बुधवंत यांनी या केसचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी झाली असता सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी ८ साक्षीदार तपासले. या खटल्यात मृताचा चुलता, सरपंच बळीराम काळे आणि इतर प्रत्यक्षदर्शी गावकरी आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
रक्ताच्या नात्याला काळिमा -आरोपींचे कृत्य
या खटल्यात सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडणारे सहायक सरकारी लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट म्हणाले की, केवळ पत्नीला नांदायला आणून आई-वडिलांपासून स्वतंत्र संसार करण्याची मृत ज्ञानेश्वरची इच्छा होती. त्याची मागणी धुडकावून आरोपींनी त्याचा खून केला. स्वत:च्या तरुण मुलास संपविण्याचे आरोपींचे कृत्य हे रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे एकाच वेळी या तिघा आरोपींना न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेप ही योग्य आहे.