चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:16 PM2019-04-30T23:16:57+5:302019-04-30T23:17:31+5:30
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.
चिकलठाणा औद्योगिक वसाहत शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहे. मात्र, या परिसरात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. येथील उद्योजक पैसा लावण्यास तयार आहेत, अत्याधुनिक मशीन आहेत, कामगारही सज्ज आहेत; पण वीजपुरवठा नसल्याने सर्व काम ठप्प पडत आहे. मागील महिनाभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या फिडरवर एक ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे कंपनीतील सर्व काम ठप्प पडत आहे. यासंदर्भात उद्योजक किशोर राठी यांनी सांगितले की, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असंख्य अडचणींना तोंड देत येथील कंपन्या तग धरून आहेत. कोट्यवधीचा महसूल या परिसरातून शासनाला प्राप्त होतो; पण त्या तुलनेत या वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. दररोज येथील उद्योगांना नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिनाभरापासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेवर उत्पादन तयार करून आॅर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे. परिणामी, नवीन आॅर्डर मिळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम, येथील उलाढालीवर होत आहे. उद्योजक मनीष अग्रवाल म्हणाले की, दररोेज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडला की, पुन्हा मशीन सुरू होऊन काम सुरळीत होण्यास एक ते दीड तास लागतो. यात विनाकारणच वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तासन्तास कामगार बसून राहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून महावितरण फॉल्ट शोधत आहे; पण यश येत नाही. लवकरात लवकर फॉल्ट शोधून वीजपुरवठा अखंडित करावा, असे आवाहन आम्हा सर्व उद्योगाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस काम करणे कठीण
मागील महिनाभरापासून कधी इंडस्ट्रिअल फिडर १, कधी फिडर २, तर कधी रेडिएन्ट फिडर, अशा तीन फिडरवरील वीजपुरवठा आलटूनपालटून बंद होत आहे. पूर्वी दिवसातून अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असे. आता तो २ ते ३ तास खंडित होत आहे. महावितरणचे अंडरग्राऊंड काम सुरू आहे. यामुळे वीज खंडित होते, असे सांगितले जात आहे. पूर्वी शुक्रवारीच वीजपुरवठा बंद होईल, असे सांगण्यात आले होते. एखाद्या दिवशी ठीक आहे; पण दररोज वीजपुरवठा बंद पडत असल्याने कंपनी चालविणे कठीण झाले आहे.
-अनुप काबरा,
उद्योजक