चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:36 PM2023-11-28T12:36:48+5:302023-11-28T12:37:30+5:30
काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा) पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत. आता घरांतून चिमणी गायब झाली आहे.
- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर - काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा) पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत. आता घरांतून चिमणी गायब झाली आहे. मात्र, आजही महिला भाजल्या जाण्याच्या घटना घडतच आहेत. आजही २५ टक्के महिलांना छळाचा ‘चटका’ सोसावा लागत असल्याचे समोर आले आहे.
शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘रिकन्स्ट्रक्टिंग वूमेन इंटरनॅशनल’तर्फे महिलांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी हंगेरी आणि फिनलंड येथील महिला प्लास्टिक सर्जन, भूलतज्ज्ञ शहरात आले आहेत. या तज्ज्ञांमध्ये डाॅ. औटी इर्मेली कार्रेला, डाॅ. लेवी बर्नडेट, डाॅ. हेली कावोला, डाॅ. सिसको करिना मेंटिला या तज्ज्ञांचा समावेश आहे.
शिबिरात प्लास्टिक सर्जरी होणाऱ्या एकूण महिलांमध्ये २५ टक्के महिला या घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. मात्र, अनेक महिला हिंसाचारानंतरही कुणाचेही नाव घेत घेण्यास तयार नाहीत. भाजण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात असे तज्ज्ञांनी सांगितले.
महिलांनो, अशी घ्या काळजी
- स्टोव्ह, गॅस, शेगडी हे जमिनीवर ठेवून स्वयंपाक करता कामा नये. यातून अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे या गोष्टी उंच ओट्यावर, किचन ओट्यावर ठेवूनच स्वयंपाक करावा.
- गॅस शेगडीला असलेली रबरी नळी वेळोवेळी बदलावी. गॅस शेगडीही नियमितपणे तपासावी.
- लहान मुले घरात असतील तर स्वयंपाक घरापासून त्यांना दूरच ठेवावे.
युरोपीयन देश अन् भारतात फरक
जळीत रुग्णांचे प्रमाण भारतापेक्षा परदेशात २० टक्क्यांनी कमी आहे. युरोपियन देशात केरोसिनचा वापर होत नाही. स्वयंपाकघरही सुरक्षित असतात.
- डाॅ. लेवी बर्नडेट, प्लास्टिक सर्जन, हंगेरी
दुर्घटनांमुळे भाजणे वाढले
घरगुती हिंसाचारामुळे भाजल्या जाणाऱ्या महिलांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झालेली आहे. दुर्घटनेमुळे भाजल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत. स्वयंपाक करताना महिलांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.
- डाॅ. रमाकांत बेंबडे, बर्न्स स्पेशालिस्ट