चीनच्या खरेदीने तांदूळ महागला; विवाद असला तरी भारतातून मोठ्याप्रमाणावर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 06:50 PM2020-12-16T18:50:14+5:302020-12-16T18:52:07+5:30
महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे.
औरंगाबाद : सीमेवर विवाद असला तरी चीनने भारतातील तांदूळ खरेदीसाठी करार केला आहे. याचा फायदा घेत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे भाव क्किंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढवून विक्री सुरू केली आहे.
महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत मागील आठवड्यात तब्बल १०० टन नवीन तांदूळ विक्रीसाठी आला. जेव्हा नवीन तांदळाची आवक सुरू होते, तेव्हा तांदळाचे भाव कमी होतात. मात्र, यंदा उलटे झाले. नवीन तांदूळ येताच भाव वधारले. मागील वर्षाच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी जास्त भावात म्हणजे २९०० ते ८८०० रुपये प्रतिक्विंटल तांदूळ विक्री होत आहे. होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, तब्बल ३० वर्षांनंतर यंदा चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयातीचा करार केला आहे. यात पहिली ऑर्डर १ लाख टनाची दिली आहे.
सध्या केंद्र सरकार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी मार्ग काढण्यात व्यस्त आहे. याचा फायदा उचलत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे दर वाढवून विक्रीला सुरुवात केली आहे, तसेच महाराष्ट्र व छत्तीसगड येथील धानाला काही प्रमाणात कीड लागल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यातच जाधववाडी बाजार समितीच्या अडत बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. ५५०० ते ६००० रुपये प्रतिप्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भाजीमंडईत पालेभाज्यांची विशेषतः मेथीची भाजी मातीमोल भावात विकली जात आहे. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकही पालेभाज्या खरेदी करीत आहेत.
चीनमुळे तांदूळ वधारला...
धान्य १३ डिसेंबर २० डिसेंबर (प्र.कि.)
तांदूळ २५ ते ९० रु. ३० ते ९८ रु.
गहू २२ ते २६ रु. २२ ते २६ रु.
ज्वारी ३० ते ३५ रु. ३० ते ३५ र.
बाजरी १९ ते २० रु. १९ ते २० रु.
पालेभाज्यांचे भाव
भाजी १३ डिसेंबर २० डिसेंबर
मेथी २ रुपये (जुडी) २ रुपये
कांदा ३० रुपये (किलो) २० रुपये
बटाटा ४० रुपये (किलो) ३० रुपये
भेंडी ३० रुपये २५ रुपये
अचानक भाववाढ
मागील आठवड्यात अचानक भाव वाढले. चीनकडून खरेदी व धानाला काही प्रमाणात कीड लागणे हे भाव वधारण्यास कारणीभूत आहे.
- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी
मेथी मातीमोल
ग्राहकांना २ रुपयांत एक जुडी मेथी विकत मिळत आहे. शेतकऱ्याच्या हाती जुडीमागे १ रुपयाच मिळतो.
- अनंत जोगदंड, शेतकरी
भाज्या स्वस्त
स्वस्त भाज्याच सध्या खरेदी करत आहोत. जानेवारीत नवीन तांदूळ खरेदी करू.
स्वाती पुराणिक, गृहिणी