चिंचोली ते करंजखेड रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:52+5:302021-03-04T04:06:52+5:30
चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी ते करंजखेड रस्त्यावर जागोजागी पाईपलाईनच्या चाऱ्या व खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली ...
चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी ते करंजखेड रस्त्यावर जागोजागी पाईपलाईनच्या चाऱ्या व खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बोरगाव - नागापूर - म्हैसघाट या ३५ किलोमीटर रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी ते करंजखेड या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहनधारकांना मरणयातना भोगाव्या लागत असून, त्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच या रस्त्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी चर खोदले आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रात्रीच्या वेळेला खोलीचा अंदाज येत नसल्याने यात वाहने आदळून अनेकांचा अपघात होऊ लागला आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे होऊ लागले आहे. चांगले रस्ते हे परिसराच्या विकासाचे द्योतक म्हणून ओळखले जाते. मात्र, चिंचोली लिंबाजी शिवारातील हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याबाबत गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिक म्हणतात...
रस्त्यांच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांबरोबरच शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदल्याने दुरूस्तीची कामे न केल्याने याचा मोठा त्रास वाहनचालक व नागरिकांना होत आहे.
- गणेश जंजाळ, चिंचोली लिंबाजी, ग्रामस्थ.
महत्त्वाच्या रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनधारकांना मणक्याचे व पाठीचे विविध आजार जडले आहेत. जागोजागी खड्डे पडल्याने आरामदायक प्रवास त्रासदायक होऊन बसला आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. विभागाने संपूर्ण रस्ता एकदाच तयार करण्याकडे लक्ष देऊन जनतेला त्रासापासून वाचवावे.
- विठ्ठल जंजाळ, अध्यक्ष - तंटामुक्त समिती
------
फोटो : चिंचोली लिंबाजी ते करंजखेड या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे