चितेगावात एटीएम फोडले परंतु रक्कम सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:21 PM2019-01-30T23:21:45+5:302019-01-30T23:22:06+5:30
चितेगाव : औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील इंडिया बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी गज घालताच सौम्य स्फोट झाला ...
चितेगाव : औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील इंडिया बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी गज घालताच सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली; परंतु एटीएम मशीनमधून चोरटे रक्कम काढू शकले नाही.
चितेगाव येथील संत ज्ञानेश्वरनगरमधील इंडिया बँकेच्या एटीएममध्ये लोखंडी रॉडच्या साह्याने एक लहानसा स्फोट घडवून चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मशीनचा समोरील लोखंडी पत्रा उखडला; परंतु चोरट्यांना एटीएममधील रक्कम काढता आली नाही. एटीएम मशीन फोडण्यापूर्वी चोरट्यांनी जवळ राहणाऱ्या लोकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. एटीएमनजीकच्या रहिवाशांना स्फोट झाल्याचा आवाज आला; परंतु समोरच औरंगाबाद- पैठण मुख्य रस्ता असल्याने त्यांना वाहनाचे टायर फुटल्याचा भास झाल्याने त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु सकाळी सहा वाजेदरम्यान त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा लावल्याचे लक्षात आले. घराचा मागील दरवाजा उघडून ते बाहेर आले असता त्यांना सदर एटीएम फोडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना सदरील प्रकाराची माहिती कळविली.
सीसीटीव्ही फुटेज
चितेगाव येथील एटीएममध्ये स्फोट घडवून तो लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले असून, चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत असले तरी चेहरा अस्पष्ट आहे. सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी केली पाहणी
चोरट्यांचा माग काढण्यासाठी औरंगाबाद येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वान रस्त्यावरच घुटमळले. एटीएम मशीनवरील बोटांचे ठसे तज्ज्ञांनी घेतले. याप्रकरणी बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार बलभीम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल पवार करीत आहेत.