चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण: गर्भपातानंतर रक्तस्त्राव रोखणारे इंजेक्शन आले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:26 PM2023-02-07T13:26:11+5:302023-02-07T13:27:22+5:30

इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाकडून शोध सुरू आहे

Chittegaon Illegal Abortion Case: Where did the post-abortion injection come from? | चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण: गर्भपातानंतर रक्तस्त्राव रोखणारे इंजेक्शन आले कुठून?

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण: गर्भपातानंतर रक्तस्त्राव रोखणारे इंजेक्शन आले कुठून?

googlenewsNext

औरंगाबाद : चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात विविध औषधींबरोबरच गर्भपातानंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन सापडले आहे. या इंजेक्शनच्या बॅच नंबरवरून त्याचा पुरवठा कुठून झाला, याचा शोध अन्न व औषध प्रशासनाने सुरू केला आहे.

चितेगाव येथील अवैध गर्भपाताच्या प्रकाराने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने औरंगाबाद स्त्री रुग्णालयात छापा टाकला, तेव्हा विविध औषधींचा साठा जप्त करण्यात आला. रुग्णालय परिसरातील औषधी दुकानांवरही चौकशी करण्यात आली. तेव्हा रुग्णालयातून औषधी घेण्यासाठी कोणीही येत नव्हते, असे औषध विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे जप्त औषधींचा, विशेषत: गर्भपातानंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन कोणी पुरविले, याचा शोध घेतला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) मिलिंद काळेश्वरकर म्हणाले, जप्त केलेल्या औषधींची यादी घेण्यात आली आहे. यात गर्भपातादरम्यान वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचाही समावेश आहे. बॅच नंबरवरून त्याचा कोणाकडून पुरवठा झाला, याची माहिती घेण्यात येत आहे.

राज्य शासनाला देणार अहवाल
अवैध गर्भपात प्रकरणाची राज्य शासनानेही गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून संपूर्ण चौकशी अहवाल राज्य शासनाला देण्यात येणार आहे. याप्रकरणी सध्या प्राथमिक अहवाल तयार झाला आहे.

महिलेची प्रकृती धोक्याबाहेर
आरोग्य उपसंचालक डाॅ. महानंदा जायभाय-मुंडे यांनी अवैध गर्भपात झालेल्या आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेच्या प्रकृतीची माहिती घेतली. महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

ग्रामीण भागातील ५७ गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू
ग्रामीण भागात मान्यताप्राप्त १०८ सोनोग्राफी आणि ५७ गर्भपात केंद्रे आहेत. त्यांची तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी दिली. या तपासणीत याठिकाणी सर्व काही नियमानुसार आहे का, याची पडताळणी होत आहे.

Web Title: Chittegaon Illegal Abortion Case: Where did the post-abortion injection come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.