'मोबाइलमुळे नाही उडाली चिऊताई भुर्र...'; चिमण्यांची संख्या रोडावण्याची 'ही' आहेत कारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:28 PM2021-03-20T13:28:22+5:302021-03-20T13:31:16+5:30
दि नेचर फॉरएव्हर सोसायटी या भारतीय संस्थेच्या पुढाकाराने २०१० पासून दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे.
औरंगाबाद : 'मोबाइल टॉवर शहरभर पसरले आणि त्याच्यापासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली...' हे आपण आजवर ऐकत आलो आणि मानत आलो आहोत. पण या चिऊताईला मोबाइलनेच भुर्रर्र उडवून लावलेले आहे, याचे अजूनतरी कोणतेही पुरावे नाहीत, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेसह इतरही पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून ओळखला जातो. चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाणे, चिंताजनक आहे. म्हणूनच चिमणीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने दि नेचर फॉरएव्हर सोसायटी या भारतीय संस्थेच्या पुढाकाराने २०१० पासून दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. चिमण्यांची कमी होत जाणारी संख्या पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोल दर्शवते.
चिमणी हा मनुष्य वस्तीच्या आधारानेच राहणारा पक्षी आहे. चिमणीचे घरटे झाडांपेक्षा जास्त भिंतींवर, कौलांवर, छतावर, असे मानवी घराच्या आडोश्याच्या ठिकाणी जास्त आढळून येते. आता सगळीकडे सिमेंटची घरे होत असल्याने माती, कौलं नाहीसे होत असल्याने चिमण्यांची घरटी नष्ट होत चालली असल्याने त्या शहरापासून दूर जात आहेत, हे चिमण्यांची संख्या कमी होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेच्या २०२० सालच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
६० ते ७० टक्क्यांनी चिमण्यांची संख्या घटली
मोबाइलच्या उंच टॉवरवरच काही पक्ष्यांनी घरटी बांधलेली दिसतात. त्यामुळे मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या घटते आहे, असे नाही. चिमण्या कमी झाल्या, याचे मुख्य कारण म्हणजे सिमेंट काँक्रीटचे वाढलेले जंगल. यामुळे चिमण्यांना घरटे बांधायला सुरक्षित जागा राहिलेली नाही. तसेच गवत, झुडपं नष्ट होत चालल्याने किडे, दाणे हे अन्नही चिमण्यांना शहरात योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या शहरातून कमी होत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ६० ते ७० टक्क्यांनी चिमण्यांची संख्या घटली आहे.
- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ञ