चांगल्या रस्त्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:39 AM2017-08-02T00:39:57+5:302017-08-02T00:39:57+5:30
महाराष्टÑ शासनाने शहरातील प्रमुख रस्ते चांगले गुळगुळीत करावेत, या उद्देशाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील प्रमुख रस्ते चांगले गुळगुळीत करावेत, या उद्देशाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी महापौर बापू घडामोडे यांनी ५० रस्त्यांची यादी जाहीर केली. या यादीतील काही रस्ते अगोदरच चांगले आणि गुळगुळीत आहेत. त्यावर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात येतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटीत ३० ते ३५ रस्त्यांची कामे होतील. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही १५० कोटींच्या ५० रस्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर शहराला १०० कोटींचे अनुदान मिळाले. उर्वरित ५० कोटी रुपये मिळविण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील...? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करताना महापालिकेला वारंवार बजावले होते की, या निधीतून एकही अंतर्गत रस्ता करू नका. शहरातील मुख्य आणि खराब रस्तेच व्हाइट टॅपिंगने गुळगुळीत करा. मुख्यमंत्र्यांसमोर मनपा पदाधिकाºयांनी होकार भरला होता. जेव्हा रस्त्यांची निवड करण्याची वेळ आल्यावर २०१९ मधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात आले. काही ठिकाणी नगरसेवकांच्या समाधानासाठी रस्ते निवडण्यात आले. वास्तविक पाहता तेथे व्हाइट टॅपिंगची गरज आहे किंवा नाही, हा साधा निकषही पाळण्यात आलेला नाही.
महापालिकेने अगोदरच कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य रस्ते डिफर पेमेंटवर तयार केले आहेत. या रस्त्यांचा फक्त सरफेस खराब झाला आहे. डांबराच्या एका थरानंतर रस्ता परत गुळगुळीत होऊ शकतो. त्यावर आता परत कोट्यवधींचा खर्च का...?
फक्त सरफेस नसलेले रस्ते
सिल्लेखाना चौक ते लक्ष्मण चावडी हा रस्ता डिफर पेमेंटवर तयार केला आहे. रस्त्याचा सरफेस वगळता त्याला काहीच झाले नाही. या रस्त्यावर ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मकबरा ते मकाई गेट रस्त्यावर २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आझाद चौक ते मनपा कार्यालय रस्त्यावर मागील वर्षीच मनपाने रोशनगेटपर्यंत सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. शहागंज चमन ते निझामोद्दीन चौक, पीरबाजार ते जानकी हॉटेल, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, सेवायोजन कार्यालय ते बंधू चौक, जवाहरनगर पोलीस ठाणे ते सावरकर चौक, कामगार चौक ते खंडपीठ, पंचवटी ते कोकणवाडी, महाराष्टÑ डिस्टिलरी ते ब्ल्यू बेल्स रेसिडेन्सी, एन-१ पोलीस चौक ते प्रोझोन मॉल, अग्रसेन चौक ते एक्साइज कार्यालय, अमरप्रीत ते शहानूरमियाँ दर्गा, सिटीचौक ते पैठणगेट, उल्कानगरी ते खिंवसरा विहार या रस्त्यांचे फक्त सरफेस खराब झाले आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था अजिबात नाही.