‘एन मार्ट’चा ९३ लाखाला चुना
By Admin | Published: May 3, 2016 11:54 PM2016-05-03T23:54:18+5:302016-05-04T00:05:37+5:30
बीड : मल्टीचेन मार्केटिंग सिस्टीमच्या माध्यमातून साडेपाच हजार रुपये गुंतवा व महिन्याकाठी किराणा सामान व रोख रक्कम मिळवा
मोहाचा ‘माया’जाल : १७०७ सभासदांना टोपी घालून सुरतचे व्यापारी पसार; दहाजणांवर गुन्हा दाखल
बीड : मल्टीचेन मार्केटिंग सिस्टीमच्या माध्यमातून साडेपाच हजार रुपये गुंतवा व महिन्याकाठी किराणा सामान व रोख रक्कम मिळवा, असे आकर्षित करणारे आमिष दाखवून सुरत येथील ‘एन मार्ट’ कंपनीने बीडमध्ये १७०० हून अधिक नागरिकांना सुमारे ९३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी कंपनीच्या चेअरमनसह ९ संचालकांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
२०१२ मध्ये शहर ठाण्याच्या समोर न्यू लूक रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या मल्टीस्टेट कंपनीने ‘एन मार्ट’ या नावाने शॉपिंग मॉल सुरु केला होता. या मॉलमध्ये सभासद होण्यासाठी साडेपाच हजार रुपयांचे शुल्क ठेवले होते. सभासद झाल्यानंतर चेन सिस्टीमने आणखी सभासद केल्यानंतर किराणा व रोख रकमेचे आकर्षक लाभ जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे व्यापारी, नोकरदार, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकही ‘एन मार्ट’च्या जाळ्यात अलगद ओढले गेले. दरम्यान, हा मॉल केवळ १४ महिने चालला. त्यानंतर ‘एन मार्ट’ ने गाशा गुंडाळला. या कंपनीचे मुख्य कार्यालय सुरतला असून, तांत्रिक अडचणींमुळे मॉल बंद केल्याची बतावणी सुरुवातीला झाली. मात्र चार वर्षांपासून मॉलचे शटर न उघडल्याने फसवणूक झाल्याचे सभासदांच्या लक्षात आले. त्यानंतर महासांगवी (ता. पाटोदा) येथील बापूराव बाबूराव राजगुरू या व्यापाऱ्याने शहर ठाण्यात धाव घेतली. पाठोपाठ बीडच्या एसटी महामंडळात चालक पदावर असलेल्या पराग प्रकाश कुलकर्णी व बीडमधीलच गृहिणी मंगल अतुल ठोकळ याही तक्रार घेऊन आल्या. पोलिसांनी शाहनिशा करुन या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राजगुरू यांनी १००, कुलकर्णी यांनी ११०० व ठोकळ यांनी ५०७ सभासद केले होते. कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे सभासदांनी या तिघांना जाब विचारला, त्यामुळे त्यांनी ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. तिघांची तक्रार घेऊन पोलिसांनी बापूराव राजगुरू यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद केला. १७०७ सभासदांचे प्रत्येकी साडेपाच हजार रुपये याप्रमाणे ९३ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती शहर ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली.
आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता
‘एन मार्ट’ च्या मायाजालात शहरासह ग्रामीण भागातील अनेकजण अडकले होते. ‘जेवढे अधिक सभासद तेवढा अधिक फायदा’ हे गणित समोर ठेवून गोरगरिबांपासून ते धनदांडग्यांपर्यंत अनेकांनी यात पैसा गुंतवला होता. कंपनीने सभासदांची फसवणूक केल्यानंतर तक्रार देण्यासही आतापर्यंत कोणी पुढे आले नव्हते, मात्र राजगुरू, कुलकर्णी, ठोकळ यांनी धाडस केल्यामुळे आता तक्रारदार आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. अनेकांना गुंतवलेला पैसा परत मिळेल की नाही? याची चिंता लागली आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
न्यू लूक रिटेल प्रायव्हेट कंपनीच्या चेअरमनसह ९ संचालकांचा आरोपींत समावेश आहे. गोपाल मोहनसिंग शेखावत असे चेअरमनचे नाव आहे. अखिल पात्रावल, प्रतीक देसाई, हिरण देसाई, सलीम खान, डॉ. रियाज मुसीर, अल्फेक मुसीर, कमलेश शहा, प्रदीप गायकवाड, प्रशांत मोरे (सर्व रा. सुरत, गुजरात) हे आरोपी आहेत.
पोलीस कर्मचारीही भुलले
‘एन मार्ट’चा शॉपिंग मॉल शहर ठाण्याच्या समोरच होता. त्यामुळे शहर ठाण्यासह इतर पोलीसही मोहात अडकले. अनेक कर्मचाऱ्यांनी यात पैसा लावला होता. या भुलभुलैय्याला सुशिक्षितही बळी पडले. (प्रतिनिधी)
‘मल्टीचेन सिस्टीम’ : तीन हजारांवर सभासदांना फसविल्याचा संशय
‘एन मार्ट’ च्या नावाने बीडमध्ये अद्यावत शॉपिंग मॉल उभारलेल्या कंपनीने मल्टीचेन सिस्टीमद्वारे अल्पावधीत हजारो सभासद केले. तूर्त १७०७ सभासदांची ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असले तरी या कंपनीने ३ हजाराहून अधिक सभासद केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा पावणे दोन कोटींच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे.
साडेपाच हजार रुपये भरुन सभासदत्व मिळविणाऱ्यास दरमहा २२० रुपयांचे किराणा सामाना मॉलमध्ये मोफत दिले जात होते. त्यासाठी कूपन सिस्टीम लागू केली होती. शिवाय उधारीवर दीड हजार रुपयांपर्यंतचे सामान खरेदी करता येत होते. चार वर्षांनंतर कंपनीतर्फे सभासदांना प्रत्येकी ११ हजार रुपये दिले जाणार होते. मात्र कंपनीने अवघ्या १४ महिन्यात शटर बंद केले. या कंपनीच्या चेअरमनसह संचालकांकडे संपर्क केल्यानंतर त्यांचे भ्रमणध्वनीही बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सभासदांपुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता.