चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे; चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 08:03 PM2024-09-05T20:03:44+5:302024-09-05T20:03:52+5:30

कोणी श्रद्धेपोटी, तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात.

Choice number now costs double; 0001 number for four wheelers now in 6 lakhs | चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे; चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत

चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे; चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चाॅइस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणे आता अधिक महाग होणार आहे; कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चाॅइस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे शौकीन वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कोणी श्रद्धेपोटी, तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात. आरटीओ कार्यालयाकडून नंबरची नवीन मालिका सुरू केल्यानंतर चाॅइस नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशा वेळी नंबरचा लिलाव केला जातो. यासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा करावा लागतो. ज्याची रक्कम अधिक, त्याला तो नंबर दिला जातो. वाहनाला ठरावीक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीन ते चार पट वाढ केली होती. आता पुन्हा एकदा या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

नऊ वर्षांनंतर वाढ
परिवहन विभागाने २०१३ मध्ये चाॅइस नंबरच्या शुल्कात वाढ केली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत चारचाकी वाहनांसाठी ०००१ हा नंबर घेण्यासाठी ४ लाख, तर इतर जिल्ह्यांत याच नंबरसाठी ३ लाख रुपये शुल्क लागत होते. आता पुन्हा या नंबरसाठी ९ जिल्ह्यांत हाच नंबर ६ लाखांना, तर इतर जिल्ह्यांसाठी हा नंबर ५ लाखांसाठी करण्यात आला आहे.

कारच्या चाॅइस नंबरचे दर
नंबर - जुना दर- नवीन दर

०००१- ४ लाख रु.- ६ लाख रु.
९९९९- १.५० लाख रु. - २.५० लाख रु.
५५५५ - ७० हजार रु.- १ लाख रु.
०००७- ५० हजार रु. - ७० हजार रु.
- २४२४- १५ हजार रु.- २५ हजार रु.

Web Title: Choice number now costs double; 0001 number for four wheelers now in 6 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.