बाजारसावंगी, बोडखा, इंदापुरात चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:04 AM2021-01-09T04:04:46+5:302021-01-09T04:04:46+5:30
बाजारसावंगी/शेखपूरवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतमध्ये १३ जागा असून येथे एकूण ४ हजार ८ मतदार आहेत. येथे निवडणुकीत ...
बाजारसावंगी/शेखपूरवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतमध्ये १३ जागा असून येथे एकूण ४ हजार ८ मतदार आहेत. येथे निवडणुकीत दोन पॅनेलच्या प्रत्येकी एक अशा दोन जागा बिनविरोध निघाल्या. ११ जागांसाठी आता समोरासमोर लढत होत आहे. माजी सरपंच भिमराव नलावडे पॅनेलतर्फे माजी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई नलावडे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अंबादास नलावडे यांच्या पत्नी आशाताई नलावडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किशोर नलावडे यांच्या पॅनेलतर्फे माजी सरपंच लक्ष्मीबाई नलावडे या रिंगणात उतरल्या असल्यामुळे या लढतीकडे या गावातील सर्वांचे लक्ष लागून आहे. बाजारसावंगी ग्रामपंचायत या भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे चुरस वाढली असून येथे ताबा मिळविण्यासाठी दोन्हीही गटातर्फे जोराचे प्रयत्न केले जात आहेत.
बोडखा व गंधेश्वर येथील ग्रामपंचायतमध्ये ९ जागा असून एकूण २१६५ मतदार संख्या आहे. माजी सरपंच अशोक जाधव व माजी पोलीस पाटील बाळकृष्ण लोंढे हे दोन्हीही आमनेसामने उभे ठाकल्याने याठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्हीही गटातर्फे वर्चस्वासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.
कनकशिळ/ इंदापूर ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कनकशिळ येथील सहा जागा बिनविरोध झालेल्या असून इंदापूर येथील एक जागा बिनविरोध तर एका जागेसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष अविराज निकम व भाजपाचे संदीप निकम हे दोघे सख्खे चुलत भाऊ निवडणूक रिंगणात आमनेसामने उभे राहिल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे.