तोतया सीआयडी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By Admin | Published: July 16, 2014 01:12 AM2014-07-16T01:12:17+5:302014-07-16T01:28:00+5:30
औरंगाबाद : उत्तर प्रदेशच्या एका व्यावसायिकाला सीआयडी असल्याची धमकी देऊन अनेकदा वसुली करणाऱ्या तोतया सीआयडीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
औरंगाबाद : उत्तर प्रदेशच्या एका व्यावसायिकाला सीआयडी असल्याची धमकी देऊन अनेकदा वसुली करणाऱ्या तोतया सीआयडीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून शहरातील चोऱ्या व लुटमारीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
तोतया सीआयडीचे नाव गुरुदीप सिंह ऊर्फ लवी पिता हरविंदर सिंह (२७) असून, तो मयुबर कॉलनी, गादिया विहार रोड, दरगाह चौक परिसरात राहतो. त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (प्रभारी) अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशच्या राठ, जिल्हा हमीरपूर येथील मूळचा रहिवासी मोहंमद समशाद अहेमद या व्यापाऱ्याने टिळकनगर रोडवर रोपळेकर हॉस्पिटलसमोर ‘न्यू बिग कॉटन बाजार’ नावाने सेल लावला आहे. त्यात रेडिमेड कपडे, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. हा सेल अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
१७ फेबु्रवारीला दुपारी ३ वाजेच्या सुमारास मॅनेजर सलीम जावेद शमीम खान काऊंटरवर होते. आरोपी गुरुदीप तेथे आला आणि विचारले की, मालक कुठे आहे, तेव्हा सलीम यांनी मोहंमद समशादकडे इशारा केला. तेव्हा आरोपी म्हणाला की, मी सीआयडी अधिकारी आहे आणि क्राईमचे काम करतो. विश्वास संपदान करण्यासाठी त्याने ओळखपत्रही दाखविले. तो यूपीच्या पोलिसासारखा दिसत होता. आरोपीचे राहणीमान आणि बोलण्याची पद्धत, बारीक पोलिसासारखी कटिंग पाहून तो सीआयडी पोलीस असल्याचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी सेल मालक मो. समशादला म्हणाला की, तुम्ही लोक यूपीतून बोगस माल आणून येथे विक्री करून लाखोचा कारभार करीत आहात.
धंदा चौपट करीन
तुमच्याकडे साहित्य विक्रीची कोणतीही परवानगी नाही, तरीदेखील बोगस कारभार करीत आहात. तुमच्यावर करवाई करून धंदा चौपट करून टाकण्याची धमकी दिली. हे ऐकून मालक घाबरला अन् आरोपीला बसवून त्याला चहापाणी करीत आवभगत केली. त्यानंतर त्याने आपले नाव गुरुदीप सिंह सांगून कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. सीआयडी अधिकारी समजून कारवाई टाळण्यासाठी समशाद याने ५ हजार रुपये देऊन सुटका केली. त्यानंतर दोन- तीन वेळा कधी १,५०० रुपये घेऊन गेला.
११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी पुन्हा सेलमध्ये आला आणि म्हणाला की मला ५ हजार अर्जंट द्या. त्यावेळी कर्मचाऱ्यांना शंका आली. ते म्हणाले की, मालक येथे नाही. तुम्ही मोबाईल नंबर देऊन जा. मालक आल्यावर बोलवून घेऊ, असे सांगितल्याने तो निघून गेला. सेल मॅनेजर सलीम जावेद याने गुन्हे शाखेला माहिती दिली.
सहायक पोलीस आयुक्त अविनाश आघाव, सहायक फौजदार आयुब पठाण यांनी आरोपीला सेलवर येण्यासाठी फोन केला.
सेलवरून फोन आल्याने आरोपी गुरुदीप पैसे घेण्यासाठी सेलवर आला अन् गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्या जवळून एक ओळखपत्र, त्यावर राष्ट्रीय पोलीस लिहिले आहे. एक स्प्लेंडर मोटारसायकल त्यावर ‘जय हिंद’ लिहिले आहे.