सीआयडीने सुरू केला महावितरणच्या आॅनलाइन कॉपीचा तपास; राज्यभर नेटवर्कचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 03:37 PM2017-11-16T15:37:51+5:302017-11-16T15:41:28+5:30
महावितरणच्या लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणात स्पाय कॅमेरा व डीवाईस, मायक्रोफोनद्वारे प्रश्नाची उत्तरे देणा-या टोळीचे नेटवर्क राज्यभर पसरले असल्याचा संशय आहे.
औरंगाबाद : महावितरणच्या लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणात स्पाय कॅमेरा व डीवाईस, मायक्रोफोनद्वारे प्रश्नाची उत्तरे देणा-या टोळीचे नेटवर्क राज्यभर पसरले असल्याचा संशय आहे. सीआयडीने पेपर फुटीप्रकरणी तपास सुरू केला आहे.
रविवार १२ नोव्हेंबर रोजी महावितरणची लिपिकपदासाठी परीक्षा होती. त्यात मुन्नाभाई स्टाइल परीक्षा देणा-याचा पर्दाफाश मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, फौजदार हारुण शेख यांच्या टीमने केला. आरोपी जीवन गिरजाराम जंघाले (२१, पाचपीरवाडी, गंगापूर), नीलेश कपूरसिंह जोनवाल (२३, डोंगरगाव, फुलंब्री), पवन कचरू बहुरे (२२, गेवराईवाडी, पैठण), दत्ता कडुबा नलावडे (२२, रा. आपत भालगाव, औरंगाबाद) यांना रविवारी हडको एन-११ येथील मयूरनगरातील एका घरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लॅपटॉप, ६ मोबाइल कार्डरीडर, ब्ल्यू टूथ डिव्हाइस, मायक्रो फोन, परीक्षेशी संबंधित पुस्तके,परीक्षेचे हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका, महत्त्वाची कागदपत्र जप्त केली होती. न्यायालयाने आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अर्जुन कारभारी घुसिंगे (२२,रा. बेंबळ्याची वाडी, औरंगाबाद) हा वैजापूर तालुक्यातील रिजवान नावाचा उमेदवार आणि चार इतर साथीदार फरार असून त्यांच्या शोधार्थ मुकुंदवाडी ठाण्याचे दोन पथके कामाला लागली आहेत.
परीक्षार्थीची केली विचारपूस
पोलीस कोठडीतील आरोपी मास्टरमाइंड अर्जुन घुसिंगे यांच्या मोबाइलचे कॉलवरून मुकुंदवाडी पोलिसांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांनादेखील विचारपूस केली आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी दोघांनी सांगितले की, अर्जुनने काही दिवसांपूर्वी संपर्क केला होता की स्पर्धा परीक्षेत पास करून देऊ, परंतु त्याने जेवढे पैसे मागितले ते देण्याची ऐपत नसल्याने नकार दिला होता. असेच दुस-या विद्यार्थ्यांनेही सांगितले.
सीआयडी पथकाने केला दौरा
राज्यात अगोदरही असेच प्रकार उघडकीस आले असून, त्यात काही विशिष्ट लोक देखील सापडले आहेत. या प्रकारची गंभीर दखल घेऊन सीआयडीचे पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी औरंगाबाद प्रकरणात तपासिक अहवाल मागितला आहे. त्यानंतर सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे आणि त्यांच्या टीमने दुपारी मुकुंदवाडी ठाण्यात दौरा करून महावितरण परीक्षेतील आॅनलाइन कॉपीच्या तपासाची सखोल माहिती घेतली. पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून नेटवर्क असे चालविले जाते याविषयी अधिक माहिती सीआयडीने जाणून घेतली. या घोटाळ्यात अजून कोण सहभागी आहेत. आतापर्यंत किती लोकांना परीक्षेत सहकार्य केले आहे. किती लोक नोकरीवर आहेत, ही देखील माहिती घेतली आहे.
घुसिंगे याच्या भावाचा मोबाइल जप्त
मुकुंदवाडी ठाण्याचे फौजदार हारुण शेख आणि टीमने बेंबळ्याची वाडी येथे भेट देऊन फरार मास्टरमाइंड आरोपी अर्जुन घुसिंगेच्या नातेवाईकाला भेटून अधिक माहिती जाणून घेतली. अर्जुनच्या भावाचा मोबाइल जप्त केला असून, त्याने केलेल्या फोनचे कॉल डिटेल्स तपासणार आहेत. वैजापूरच्या रिजवानच्या घरीदेखील छापा मारून लॅपटॉप व इतर कागदपत्र जप्त केले आहे.