सिडको वाळूज महानगरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:02 AM2021-04-24T04:02:11+5:302021-04-24T04:02:11+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी ...
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी कृती समिती संतप्त पदाधिकारी व नागरिकांनी सिडकोच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
महिनाभरापासून सिडको वाळूज महानगर १ व २ मधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. या भागात आठवड्यातून केवळ दोनदा अत्यल्प व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे सिडको वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून, जलवाहिनीतून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते. या शिवाय जलकुंभही अनेकदा ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असते. येथील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नासंदर्भात या भागातील नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे सतत तक्रारी केल्या आहे. मात्र सिडकोचे अधिकारी केवळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्याने नागरिकांत असंतोष आहे.
चौकट
नियोजनअभावी टंचाई
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सिडकोच्या कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिडकोचे कार्यकारी अभियंता कपील राजपूत यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. महानगर-१ मध्ये नवीन जलकुंभ उभारण्यात यावा, पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोबाइल क्रमांक सार्वजनिक करून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्यासंदर्भात पाठपुरावा करावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. याप्रसंगी अभियंता राजपूत यांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष तथा तीसगावचे सरपंच नागेश कुठारे, उपाध्यक्ष काकासाहेब बुट्टे, नरेंद्र यादव, सुदाम जाधव, संदीप घुगे, दीपक जगताप, वाय. जी. पिंपळे, मच्छिंद्रनाथ कुंभार आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.