सिडकोच्या तक्रारीनंतरही गुन्हे दाखल होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:50 PM2018-12-20T18:50:12+5:302018-12-20T18:51:14+5:30
सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्यपणे भुखंडाच्या खरेदी-विक्री प्रकरणी सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाळूज येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या गट क्रमांक ३ मध्ये विकासकाने अनधिकृत रेखांकन केले आहे. या गटनंबरमध्ये नियोजित हनुमाननगरात अनधिकृत प्लॉटिंग पाडून विक्री केली जात आहे. याच प्रमाणे वाळूजला गट क्रमांक गट क्रमांक २२९ मध्ये अॅक्सा प्लॉटिंग सेंटर, गट नंबर २३७ मध्ये हाशिम पापा, गट क्रमांक २३८ मध्ये भारत लाँन्स व याच गट नंबर परमेश्वर वाघमारे यांनी साई सृष्टी पार्क आदी गट नंबरमध्ये संबंधिताने सिडको प्रशासनाची परवानगी न घेता भुखंडाची खरेदी-विक्री सुरु केली आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांनी संबधित विकासकांविरुद्ध १२ डिसेंबरला वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गटनंबरमधील अनधिकृत भुखंडाच्या खरेदी-विक्रीमुळे सर्व सामान्य नागरिकांची बिल्डराकडून फसवणूक होऊ नये, यासाठी संपूर्ण रेखाकंन निष्कासित करण्यात यावे, यासंबधी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विशेष म्हणजे सिडको प्रशासनाच्यावतीने वडगाव कोल्हाटी व शरणापूर हद्दीत अनधिकृत भुखंड खरेदी-विक्री प्रकरणी जवळपास २०लोकांविरुध्द तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीवरुन संबधित बिल्डराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. अनेक बिल्डर फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे म्हणाले, वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यासाठी अद्यापपर्यंत संपर्क साधला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
भुखंडाची खुलेआम विक्री सुरुच
विशेष म्हणजे सिडको प्रशासनाने यापुर्वीही संबधित बिल्डरांना नोटीसा बजावल्या आहेत. या नोटिशींना लोकांनी केराची टोपली दाखवत भुखंडाची विक्री सुरुच ठेवली आहे. या लोकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरुन गावठाण प्रमाणपत्राचे आधारे भूखंड विक्री करुन या भुखंडाच्या रजिस्ट्री करुन दिल्या जात आहेत.
गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ
सिडको प्रशासनाने वाळूज परिसरातील पाच गट नंबरपणे सुरु असलेल्या अनधिकृत भुखंड खरेदी-विक्री प्रकरणी संबधितांविरुध्द आठवडाभरापूर्वी तक्रार दिली आहे. मात्र, अद्यापर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले नाहीत.