सिडको महानगरातील क्रीडा संकुल धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:50+5:302020-12-11T04:21:50+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात लाखो रुपये खर्चून उभारलेले दोन मिनी क्रीडा संकुल धूळखात पडून आहेत. या क्रीडा ...
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात लाखो रुपये खर्चून उभारलेले दोन मिनी क्रीडा संकुल धूळखात पडून आहेत. या क्रीडा संकुलाचा वापर होत नसल्यामुळे परिसरातील खेळाडूंचा हिरमोड होत आहे.
सिडको प्रशासनाने तीन-चार वर्षांपूर्वी रोज बडस् स्कूल व मुंबई महामार्गालगत प्रत्येकी दीड हेक्टर जागेवर दोन मिनी क्रीडा संकुल उभारले आहेत. या क्रीडा संकुलात व्यायामाचे साहित्य, ड्रेसींग रुम, महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, जॉगीग ट्रॅक, योगा फ्लोअर आदी सुविधा आहेत. या मिनी क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले असून उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही. आजघडीला देखभाल व दुरुस्तीकडे सिडको प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हे क्रीडा संकुल अडगळीत पडले आहे. क्रीडा संकुलाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे वाढली आहेत. प्रवेशद्वारे उघडेच राहत असल्यामुळे क्रीडा संकुलात जनावरे चारविण्यात येत आहेत. ड्रेसिंग रुम व स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून खिडक्याच्या काचाही फुटल्या आहेत. सिडको प्रशासनाने लाखो रुपये खर्चून ही क्रीडा संकुले उभारली. परंतु, वापराविना ती पडून असल्यामुळे खेळाडूंत नाराजीचा सूर उमटत आहे. हे क्रीडा संकुल करार तत्त्वावर देण्यात यावे, यासाठी प्रा. भरत सलामपुरे यांनी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. सिडको प्रशासनाने त्यालाही नकार देत असल्याचे प्रा. सलामपुरे यांनी सांगितले.
क्रीडा संकुलाचा स्वच्छतेचा प्रस्ताव
या संकुलाची साफसफाई करुन किरकोळ दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. आता लवकरच मुख्य प्रशासकाकडे स्वच्छतेचा प्रस्ताव सादर करुन हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सहायक कार्यकारी अभियंता के. व्ही. राजपुत यांनी सांगितले.
फोटो ओळ- सिडको वाळूज महानगरातील मिनी क्रीडा संकुलाची अशी अवस्था झाली आहे.
-------------------------------