सिडकोने पोलीस बंदोबस्तात भूखंडावर उभारली संरक्षक भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:12+5:302021-06-16T04:06:12+5:30
वाळूज महानगर : तीसगावच्या गट क्रमांक १०७ मधील २५ टक्के संपादित क्षेत्रातील १ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर सोमवारी ...
वाळूज महानगर : तीसगावच्या गट क्रमांक १०७ मधील २५ टक्के संपादित क्षेत्रातील १ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर सोमवारी (दि.१४) सिडको प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात संरक्षक भिंत उभारुन भूखंड ताब्यात घेतला. या भूखंडावर पेट्रोल पंप चालकाने अतिक्रमण करून वापर सुरू केला होता.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील साऊथ सिटीच्या पश्चिमेला तीसगावच्या गट क्रमांक १०७ मधील २५ टक्के संपादित क्षेत्र सिडको प्रशासनाच्या अखत्यारित हा भूखंड आहे. या भूखंडालगत पी.एम.चोरडिया यांचा पेट्रोल पंप असून या भूखंडावर चोरडिया यांनी अतिक्रमण केले होते. सिडकोचे तत्कालीन प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी सन २०१५/१६ मध्ये हे अतिक्रमण जमीनदोस्त केले होते. परंतु सिडको प्रशासनाने या १ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर संरक्षक भिंत उभारली नाही. त्यामुळे भूखंडाचा वापर पेट्रोल पंप चालकाकडून सुरूच होता. सिडकोने या भूखंडावर संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय सोमवारी घेतला. सिडकोचे प्रशासक भुजंगराव गायकवाड, सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे, भूमापक मीनल खिल्लारे आदींच्या पथकाने या क्षेत्राचे मोजमाप केले. पोलीस बंदोबस्त घेऊन सिडकोने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला पेट्रोल पंप चालकाने मोजमाप व भिंत उभारण्यास विरोध दर्शविला होता. सायंकाळी उशिरापर्यंत संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेगात सुरु होते.
फोटो ओळ- साऊथ सिटीतील पेट्रोल पंपालगतच्या तीसगावच्या गट क्रमांक १०७ मधील २५ टक्के संपादित क्षेत्रातील भूखंडावर सिडको प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात संरक्षक भिंत उभारली.