सिडको-हडकोवासियांचा पाण्यासाठी पुन्हा ठिय्या; विस्कळीत वेळापत्रकाने नागरिकांचा पालिकेवर रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:45 PM2022-05-06T13:45:16+5:302022-05-06T13:56:26+5:30
आंदोलनात नागरिकांना पाणी पुरवठा विभागाच्या तक्रारींचा पाढाच वाचला.
औरंगाबाद : सिडको-हडको भागात पाण्याचे वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाला आहे. पाणी येण्याचा दिवस आणि वेळ निश्चित नाही. यामुळे या भागातील नागरिकांनी एक महिन्यानंतर आज पुन्हा ठिय्या आंदोलन करत महापालिकेचा निषेध केला. एन- ७ येथील पाणी पुरवठा विभागाच्या समोर झालेल्या या आंदोलनात नागरिकांना पाणी पुरवठा विभागाच्या तक्रारींचा पाढाच वाचला.
शहराच्या पाणीपुरवठ्यात विविध संकटांचे विघ्न संपायला तयार नाही. कधी पाईपलाईन फुटते तर कधी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा मात्र विस्कळीत झाला आहे. अनेक वसाहतींना आजही नऊ ते दहा दिवसानंतर पाणी मिळत असल्याने, नागरिकही संतापाचा भोंगा वाजवीत आहेत. सिडको हडको वासियांनी एप्रिलमध्ये केलेल्या आंदोलनानंतर वेळेवर आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही भागात पुरवठा पूर्ववत झाला नाही. यामुळे आज सकाळी नागरिकांनी पुन्हा एकदा एन-७ येथील पाणी पुरवठा विभागावर हल्लाबोल करत ठिय्या दिला. आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी, विस्कळीत वेळापत्रक, याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. महापालिकेच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक अडचणी
शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करा, चौथ्या दिवशी विविध वसाहतींना पाणीपुरवठा करा, असे आदेश प्रशासनाने दिले आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी पाणीपुरवठाही वेळापत्रकात पळत नाहीत. त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यातच पाईपलाईन फुटणे, वीज पुरवठा खंडित होणे, व्हॉल्व्ह लिकेज यासारखे प्रकार दररोज घडत आहेत.