सिडको महानगर-२ : पाच दिवसांआड पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:50 PM2019-04-06T21:50:09+5:302019-04-06T21:50:23+5:30
पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगर - २ मध्ये पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून कोट्यापेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी पाच एमएलडीची असून, पुरवठा तीन एमएलडीचा होत असल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे.
सिडको वाळूज महानगर परिसरात प्रशासन एमआयडीसीकडून पाणी घेऊन रहिवासी भागात पाणी पुरवठा करते. काही दिवसांपूर्वी सिडको वाळूज महानगरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, नागरी वसाहती वाढल्यामुळे सिडकोने तीन दिवसांआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. या भागातील रहिवाशांना आठवड्यात फक्त दोनच दिवस पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीकडून सिडकोला गुरुवारी पाणी पुरवठा झाला नव्हता.
त्यामुळे सिडकोचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले. आता तर पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याची ओरड रहिवाशांतून होत आहे. तसेच बोअर व हातपंपाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नागरिकांना सिडकोच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते. पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा व तक्रारी करुनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा सिडको प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नारायण हातोळे, राजेश देशमुख, कैलास निकम, संजय भंगाळे, श्रीराम गायकवाड, उद्धव शेळके, किशोर पाटील, कैलास यादव, बाळासाहेब पाटील, कृष्णा पवार, प्रल्हाद बोबडे, अॅड.तांदुळजे, श्रीराम गायकवाड, भारत जाधव, सखाराम चव्हाण, प्रकाश वाघ, दिंगबर निकम आदींनी दिला आहे.