छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-३ मध्ये घरभाडे सर्वांत जास्त; पाणी नाही तिथे भाडे कमी
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 8, 2023 07:54 PM2023-04-08T19:54:22+5:302023-04-08T19:55:48+5:30
सर्वाधिक सुविधा ज्या भागात त्या भागास पसंती; तीन वर्षांत ५ टक्के वाढ
छत्रपती संभाजीनगर : शहरात नवीन घर खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तसेच येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यामुळे अनेक जण घरात गुंतवणूक करून ते भाड्याने देत आहेत. त्यातून चांगले उत्पन्नही सुरू झाले आहे. ज्या भागात पाण्यापासून ते शाळा, कॉलेज, मॉलपर्यंत सर्व सुविधा जवळ आहेत अशा भागात सर्वाधिक भाडे द्यावे लागते, तर जिथे महानगरपालिकेचे पाइप व ड्रेनेजलाइन आली नाही तिथे घरभाडे थोडे कमी आहे.
कोरोनाकाळापासून अनेक जण स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेले. यामुळे शहरात आजघडीला किरायाने दिले जात असलेली अनेक घरे रिकामी आहेत. याचा परिणाम भाडेवाढीवर झाला. जिथे वर्षाला १० टक्के भाडे वाढ होते तिथे मागील तीन वर्षांत ५ टक्क्यानेच भाड्यात वाढ झाली.
कोणत्या भागात काय घरभाडे ?
परिसर वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके बंगला
सिडको एन ३- २०-३५ हजार, ४०- ५० हजार, ५५-७० हजार
ज्योतीनगर परिसर १०-१५ हजार, २०- ३० हजार, ३०-३५ हजार, ६० ते ६५ हजार
बीड बायपास ६- ७ हजार, ८ ते १० हजार, १५ ते २० हजार, २०-२५ हजार
विमानतळ रोड - २० ते २५ हजार, ३०- ३५ हजार, ४० ते ४५ हजार
(यातही विना फर्निचर व फर्निचरसहित फ्लॅटच्या भाड्यात ३ ते ४ हजारांची तफावत येते)
(ही आकडेवारी इस्टेट एजंटने सांगितल्यानुसार आहे)
सर्वांत महाग सिडको एन-३
सिडको एन-३ व एन ४ या परिसरात घराचे भाडे महाग आहे. कारण, हा परिसर हॉट प्रॉपर्टी म्हणून गणला जातोय. याशिवाय चिकलठाणा विमानतळ, ज्योतीनगर, गारखेडा सूतगिरणी ते शहानूरमिया दर्गा रोड या सर्व भागात भाडे जास्त आहे. कारण, येथे बाजारपेठ जवळ, शाळा, कॉलेज जवळ, हॉस्पिटल जवळ आहे. लोकेशन चांगले असल्याने येथे भाडेही जास्त आहे.
ज्या भागात पाणी नाही तिथे भाडे कमी
ज्या भागात महानगरपालिकेचे पाणी व ड्रेनेजलाइन नाही त्या भागात भाडे कमी आहे. उदाहरण बीड बायपास रोड होय, सातारा ते झाल्टा फाट्यापर्यंतच्या भागात थोडे भाडे कमी आहे.
५ टक्क्याने वाढले भाडे
कोरोनाकाळाच्या आधी दरवर्षी ५ ते १० टक्क्याने घरभाडे वाढविले जात असे; पण कोरोनाकाळानंतर परिस्थिती बदलली व अनेक जण स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेले. काही जण गावाकडे निघून गेले. यामुळे मोठ्या प्रमाणात घरे रिकामी राहिली. परिणामी, मागील तीन वर्षांत घरभाडे ५ टक्क्यांनीच वाढले.
घर भाड्याने घेताना घ्या काळजी
१) घरापासून जवळच शाळा, नोकरीचे ठिकाण असावे.
२) पाणी मुबलक आहे का व नळाचे की बोरचे हे पाहा.
३) भाड्याचा करार १२ महिन्यांचा की लाँग टर्म हे पाहा.
४) घरात लिकेज आहे का, विद्युत वायरी व्यवस्थित व डागडुगी करायची आहे का, ते पाहा.
५) भाडे लाइट बिलासहित की, लाइट बिल स्वतंत्र ते बघा.
६) घर भाड्याने घेतल्यास पहिले पोलिस स्टेशनला नोंद करा.
फर्निचर व बगर फर्निचर घर भाड्यात तफावत
शहरात अनेकांनी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली आहे व ते भाड्याने दिले जात आहे. हा मोठा व्यवसाय बनला आहे. फ्लॅट विनाफर्निचर व सेमी फर्निश्ड अथवा फूल फर्निश्ड भाड्यामध्ये फरक पडतो. एरियापेक्षा अनेक जण आपल्या बजेटमध्ये कुठे घर भाड्याने मिळते ते पाहतात.
- अमर ठाकूर, इस्टेट एजंट