सिडको एन ७, किराडपुरा, बेगमपुरा, मुकुंदवाडी शाळांतही आता ‘असुदे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:41+5:302021-09-03T04:04:41+5:30
‘असुदे’ फाउंडेशनने गेल्या वर्षी मनपा शाळांतील आठवी ते दहावीच्या ६१ शिक्षक आणि ६५२ विद्यार्थ्यांपर्यंत साधनांची कमतरता असताना ऑनलाईन शिक्षण ...
‘असुदे’ फाउंडेशनने गेल्या वर्षी मनपा शाळांतील आठवी ते दहावीच्या ६१ शिक्षक आणि ६५२ विद्यार्थ्यांपर्यंत साधनांची कमतरता असताना ऑनलाईन शिक्षण पोहचवण्यात यश मिळवले. शिक्षकांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण दिले. नाॅर्थ स्टार उपक्रमाद्वारे शाळांना जागतिक स्वयंसेवकांसोबत जोडून क्रियात्मक शिक्षण, पुस्तके, व्हिडिओ उपलब्ध करुन शिक्षण दिले, असे मुख्य कार्यक्रम अधिकारी अलरिया खरगे म्हणाल्या. यावर्षी मनपाच्या आणखी चार शाळा या प्रकल्पात जोडत आहोत. आता आठ शाळांत दहावीच्या वर्गांचे वेबकॅमेऱ्यांद्वारे शिक्षक- विद्यार्थ्यांना जोडले जाणार आहे. ‘शाळा बंद आहेत पण, शिक्षण चालू असुदे’ या ब्रीद वाक्याद्वारे ही संस्था काम करत असल्याचे खरगे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात केलेल्या कामासंदर्भातील २०२०-२१ चा प्रकल्प अहवाल संस्थेचे संचालक व्यंकटेश खारगे, अलरिया खारगे, कार्यक्रम व्यवस्थापक पंकज तांदुळकर यांनी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांना सादर केला. यावेळी संस्थेच्या कामाचे पाण्डेय यांनी कौतुक केले. मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले, संस्थेचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे. या उपक्रमासाठी उपायुक्त संतोष टेंगले, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांचेही मार्गदर्शन लाभले. २०२२-२३ मध्ये १२, २०२३-२४ मध्ये २४, २०२४-२५ मध्ये ४८, तर २०२५-२६ मध्ये ७१ शाळांत हा प्रकल्प राबवून सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ होईल, असे या अहवालात म्हटले आहे.
(फोटो आहे.)