सिडको वाळूज महानगरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:27 PM2019-06-27T21:27:51+5:302019-06-27T21:28:00+5:30
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून जवळपास ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सिडको वाळूज महानगरात घडली.
वाळूज महानगर : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून जवळपास ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सिडको वाळूज महानगरात घडली.
राजेंद्र कन्हैयालाल अग्रवाल हे सिडको वाळूज महानगरातील प्लॉट नंबर ५१९ फ्लॅट नं ३ येथे कुटुंबासह राहतात. मंगळवारी पहाटे ५:३० वाजता आग्रवाल हे हॉटेलवर व मुलगा सकाळी ७ वाजता शाळेत गेला होता. तर ९ वाजता पत्नी नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त कन्नड येथे गेली होती. दरम्यान, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून जवळपास ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास अग्रवाल यांचा मुलगा घरी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त व ड्रॉव्हर खाली पडलेले दिसले.
वडिलांना कळविल्यानंतर तेही घरी आले. कपाटात ठेवलेल्या तोळे ६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह पायातील चैन गायब असल्याचे दिसून आले. अग्रवाल यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, गुरुवारी (दि.२७) पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार राहुल रोडे व स.फौजदार गौतम खंडागळे हे करित आहेत.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
राजेंद्र अग्रवाल यांच्या घरालगत असलेल्या एका इमारतीच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. दुचाकीवर ट्रीपलसीट आलेल्या चोरट्यांपैकी एक चोरटा सुरुवातीला अग्रवाल यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये जात असल्याचे व १० ते १५ मिनिटानंतर दुसरे दोघे पाठीमागून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.