सिडकोची जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:01 AM2019-04-18T00:01:59+5:302019-04-18T00:03:16+5:30
धुळे-सोलापूर महामार्गासाठी जेसीबीने खोदकाम करताना बुधवारी एएस क्लब चौकालगत सिडकोची जलवाहिनी फुटली.
वाळूज महानगर : धुळे-सोलापूर महामार्गासाठी जेसीबीने खोदकाम करताना बुधवारी एएस क्लब चौकालगत सिडकोची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. दरम्यान, सिडको प्रशासनाने दुपारी एक वाजेच्या सुमारास जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.
धुळे-औरंगाबाद-सोलापूर महामार्गाचे काम एल अॅण्ड टी या कंपनीकडून युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, हे काम करताना संबंधित कंपनीकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कामासाठी एएस क्लब चौक ते तीसगाव चौफुली दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबीने खोदकाम केले जात आहे. एएस क्लब चौकातलगत असलेल्या पुलाजवळ बुधवारी सकाळी जेसीबीने खोदकाम करीत असताना म्हाडा कॉलनीसह परिसराला पाणीपुरवठा करणारी सिडकोची मुख्य जलवाहिनी फुटली. कामगार व त्यांच्या वरिष्ठांनी याची सिडको प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नाही.
त्यामुळे सकाळी साडेदहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी पाणी वाहून जात होते. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर सिडकोकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या विषयी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, धुळे-सोलापूर रस्त्याचे काम करताना म्हाडा कॉलनीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.