सिडकोत ड्रेनेज व जलवाहिनीवरील अतिक्रमण काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:22 PM2019-09-02T23:22:09+5:302019-09-02T23:22:19+5:30
ड्रेनेज व जलवाहिनीवरील अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.
वाळूज महानगर : ड्रेनेज व जलवाहिनीवरील अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. या अतिक्रमणावर लवकरच हातोडा पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सिडकोवाळूज महानगरात एमआयजी, एलआयजी आदी परिसरात ड्रेनेज व पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर अनेकांनी अतिक्रमण करुन घराचे ओटे, पायºया, गेट, जिन्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहनधारकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच ड्रेनेज व जलवाहिनीलाही सारखी गळती लागत आहे. ड्रेनेजलाईन लिकीज होत असल्याने घाण पाणी रस्त्यावर नागरिकांच्या घरासामरेच साचत आहे.
घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना ये-जा करण्यासही गैरसोय होत आहे. तर पाईपलाईन गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहत जात असल्याने नागरिकांना पाणी असूनही टंचाईचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी या अतिक्रमणामुळे प्रशासनाना ड्रेनेज व पाईपलाईनची दुरुस्ती करणे अवघड जात आहे. या अनधिकृत बांधकामामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची ओरड नागरिकांमधून केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाकडून या अनाधिकृत बांधकामाची पाहणी करुन आठवडाभरात त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.