सिडकोत ड्रेनेजलाईन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:15 PM2019-03-10T23:15:54+5:302019-03-10T23:16:06+5:30
सिडको जलकुंभाशेजारील तीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली आहे. उघड्यावर सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
वाळूज महानगर : सिडको जलकुंभाशेजारील तीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली आहे. उघड्यावर सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सिडको वाळूज महानगरात एसटीपी प्लाण्टची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शोषखड्डे व ड्रेनेजलाईनचे चेंबर सारखे चोकअप होत आहे. घाण सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील जलकुंभ परिसरात तीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ड्रेनेजलाईनच फुटली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. बाजूलाच नागरी वसाहत आहे. शिवाय शुद्ध हवा मिळावी म्हणून दररोज सकाळ-संध्याकाळ महिला-पुरुष मोठ्या संख्येने फिरायला येतात. मात्र ड्रेनेजच्या पाण्यामुळे त्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून उग्र वासामुळे नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाने फुटलेल्या ड्रेनेजलाईनची तात्काळ दुरुस्ती करुन नागरिकांची दुर्गंधीतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमूधन केली जात आहे.