सिडकोत भरदिवसा शिक्षकाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:06 PM2019-01-11T17:06:54+5:302019-01-11T17:07:17+5:30
बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी घरातील रोख दीड लाख रुपयांसह पावणेतीन तोळे सोने असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सिडको वाळूज महानगरातील राजवर्धन हौ. सोसायटीत घडली.
वाळूज महानगर : बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी घरातील रोख दीड लाख रुपयांसह पावणेतीन तोळे सोने असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सिडको वाळूज महानगरातील राजवर्धन हौ. सोसायटीत घडली.
अशोक बळीराम आव्हाळे हे सिडको वाळूज महानगरातील राजवर्धवन हौ. सोसायटीतील प्लॅट नं. ६८२ येथे पत्नी ज्योत्स्ना व मुलगी तृष्णा यांच्यासह वास्तव्यास आहेत. आव्हाळे शिक्षक असून वाळूज औद्योगिक क्षेत्रात त्यांची प्लास्टिकची एक कंपनीही आहे. आव्हाळे बुधवारी सकाळी कंपनीत गेले होते तर मुलगी तृष्णा शाळेत गेली होती. ज्योत्स्ना या घराला कुलूप लावून सोसायटीतील इतर महिलांसोबत टेरेसवर गप्पा मारत बसल्या होत्या. शाळेतून आलेली मुलगीही आईसोबत गच्चीवरच थांबली होती. चार वाजता जोत्सना मुलीसह खाली आल्या असता त्यांना दरवाज्याला लावलेले कुलूप गायब असल्याचे व कडी कोंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी लगेच घरात पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच ज्योत्स्ना यांनी अशोक यांना याविषयी माहिती दिली. अशोक यांनी तात्काळ घरी येवून कपाटातील सामानाची पाहणी केली.
कंपनीच्या कामासाठी कपाटात ठेवलेले रोख १ लाख ५५ हजार रुपये व १३ ग्रॅमची सोन्याची माळ, १३ ग्रॅमची गळ्यातील सोन्याची पोत, १ गॅ्रमच्या कानातील रिंग तसेच ज्योत्स्ना यांच्या पर्समधील रोख साडेतीन हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डिबी प्रमुख फौजदार राहुल रोडे यांनी पोहेकाँ. वसंत शेळके, राजकुमार सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड, कोलीमी यांच्यासह घटनास्थळी जावून घटनेची पाहणी केली.दरम्यान चोरीच्या घटनात वाढ होत असल्याने नागकिांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे पोलीसांनी सांगितले.