सिपेट, देवगिरी, पीईएस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:36+5:302021-03-14T04:04:36+5:30
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील कोविड केअर सेंटर्सची क्षमता कमी पडू लागली आहे. त्यामुळे मनपा ...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील कोविड केअर सेंटर्सची क्षमता कमी पडू लागली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने सिपेट, देवगिरी महाविद्यालय, पीईएस महाविद्यालयात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीनही सेंटरमध्ये मिळून सुमारे ६५० रुग्णांची व्यवस्था होऊ शकणार आहे.
महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी बंद केलेली कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पदमपुरा आणि मेल्ट्रॉन येथीलच कोविड केअर सेंटर वर्षभर सुरु होते. रुग्णसंख्या वाढताच एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, किलेअर्क, एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये मिळून शुक्रवारी १,३९८ रुग्ण दाखल होते आणि कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या १,४९३ होती. म्हणजेच सुमारे शंभर खाटा शिल्लक होत्या.
रुग्णवाढीचे प्रमाण असेच राहिल्यास शहरात कोठेही रुग्णांना बेड मिळणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन आणखी ३ कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिपेट येथील पूर्वीची इमारत ताब्यात घेतली जाणार आहे. याठिकाणी तीनशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाशी चर्चा झाली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचाही ताबा कोविड केअर सेंटरसाठी घेतला जाणार आहे. देवगिरी व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही ठिकाणी मिळून ३५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. सोमवारपासून ही कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे नियोजन आहे.