सिडको एन-४ मधील प्रस्तावित वाईन शॉपला नागरिकांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:17 PM2022-07-26T12:17:19+5:302022-07-26T12:18:09+5:30
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने दुकानास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
औरंगाबाद : सिडको एन-४ मधील प्लॉट नंबर ८ वरील प्रस्तावित एच.पी. वाईन शॉपला परिसरातील नागरिकांसह महिलांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांसह इतरांना शॉपला परवानगी न देण्याचे निवेदन दिले आहे.
सिडको एन-४ येथील निवासी भागात प्रणिता अमरीश जैस्वाल आणि श्वेता अभिषेक जैस्वाल यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एच.पी. वाईन्स देशी व विदेशी मद्याच्या दुकानाचा प्रस्ताव सादर केला आहे. या दुकानावर लेखी आक्षेप नोंदविण्याच्या नोटिसा लावल्या आहेत. प्रस्तावित दारू दुकानाचा प्लॉट हा निवासी प्रयोजनार्थ दिलेला आहे. मात्र, त्याठिकाणी दारूचे दुकान सुरू झाल्यास परिसरातील नागरिक, वृद्ध, लहान मुले, मुली आणि महिलांना त्रास होणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक दारू विकत घेण्यासाठी त्याठिकाणी येतील. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या दुकानास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. स्थानिकांचा विरोध झुगारून दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. माजी नगरसेविका माधुरी आदवंत, सामाजिक कार्यकर्ते मनोज बोरा यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांनी माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे यांची भेट घेतली. त्यांनीही दुकान सुरू होऊ देणार नसल्याचे नागरिकांना कळविले.
यावेळी माजी नगरसेविका जयश्री किवळेकर, मोहन आहेर, अर्जुन चव्हाण, प्रकाश साखरे, शीतल ढाकणे, उषा तोष्णीवाल, मेघा गुडे, जयश्री डिघोळे, अनिता सानप, सुनंदा घुले, वर्षा गीते, मेघा सांळुके, शालिनी गायकवाड, स्वाती डिघुळे, संगीता धानुरे, निशांत रामगीरवार, बजरंग विधाते, स्मिता कुलकर्णी, आर. पी. गायकवाड, निला साखरे, पायल रामगिरवार, विवेक कंगळे, वामन दाणेकर, आदी उपस्थित होते.