नागरिक म्हणाले, सर..तुम्ही रोज मनपात येणार का...आयुक्त म्हणाले आवाज कमी करून बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:07 PM2018-09-27T23:07:24+5:302018-09-27T23:08:59+5:30
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना गुरुवारी दुपारी नागरिकांनी त्यांच्या दालनापासून तर पार्किंगपर्यंत गराडा घालून तक्रारी मांडल्या. आयुक्त पालिकेत येत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आहे. सर...तुम्ही रोज अभ्यागतांच्या भेटीसाठी मनपात येणार काय? असा प्रश्न नागरिकांनी आणि माध्यमांनी करताच आयुक्त म्हणाले, आवाज कमी करून बोला. मला शहरात इतर अनेक कामे असतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. शहरासाठी जे महत्त्वाचे काम असेल ते मी करील. आयुक्तांच्या या उत्तरामुळे ते मनपात दररोज येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना गुरुवारी दुपारी नागरिकांनी त्यांच्या दालनापासून तर पार्किंगपर्यंत गराडा घालून तक्रारी मांडल्या. आयुक्त पालिकेत येत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आहे. सर...तुम्ही रोज अभ्यागतांच्या भेटीसाठी मनपात येणार काय? असा प्रश्न नागरिकांनी आणि माध्यमांनी करताच आयुक्त म्हणाले, आवाज कमी करून बोला. मला शहरात इतर अनेक कामे असतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. शहरासाठी जे महत्त्वाचे काम असेल ते मी करील. आयुक्तांच्या या उत्तरामुळे ते मनपात दररोज येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
हे असेच चालत राहिले तर सामान्य नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी ‘दलाल’ हाच पर्याय राहणार काय, असा प्रश्न आहे. आयुक्तांनी पालिकेत दुपारी ३ ते ५ या वेळेत सामान्यांना भेटण्यासाठी नित्यक्रम ठेवला तर दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होईल. तसेच नागरिकांनादेखील ‘दलालां’कडे जाण्याची वेळही येणार नाही, असे मत काही नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. आयुक्त मर्जीप्रमाणे पालिकेत येत असल्यामुळे गुरुवारी दुपारी १.३० वा. त्यांना नागरिकांनी गराडा घातला. स्वीय सहायकांच्या दालनापासून ते त्यांच्या कारपर्यंत नागरिक त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत होते. आयुक्तांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, एवढेच काय ते नागरिकांना समाधान. आस्थापना विभाग, अतिक्रमण, रस्त्यांसह अनेक तक्रारींच्या अनुषंगाने नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी थांबले होते. आयुक्त पालिकेतून निघताच सामान्य नागरिकांनी त्यांना कारपर्यंत सोडले नाही. तासभर आयुक्तांना नागरिकांनी गराडा घातला. आयुक्तांना नागरिकांनी घातलेला गराडा पत्रकारांनी कॅमेºयात टिपण्याचा प्रयत्न केला असता आयुक्त व त्यांच्या अंगरक्षकांनी विरोध केला.
आस्थापना विभागाच्या तक्रारी
आस्थापना विभागाशी निगडित अनेक तक्रारी घेऊन सेवानिवृत्त कर्मचारी पालिकेत आले होते. पेन्शन व इतर समस्यांसह त्यांच्या अडचणी आहेत. विभागप्रमुख मंजूषा मुथा आणि सहायक आयुक्त दराडे यांना पालिकेत काम करण्याची इच्छा नसल्यामुळे या विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सेवानिवृत्तांनी माध्यमांकडे बोलताना केला. दराडे आणि मुथा प्रतिनियुक्तीवर मनपात आले आहेत. एका कर्मचाºयाला मदत करा, तो अनेक दिवसांपासून हेलपाटे मारतो आहे. अशा शब्दात महापौर घोडेले यांनी उपायुक्त मुथा यांना आज पत्रकारांसमक्ष सूचना केल्या. या प्रकरणावरून अंदाज येतो की, पालिकेत कसा कारभार सुरू आहे.