ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना आता ७ दिवस क्वारंटाईन ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:03 AM2020-12-30T04:03:51+5:302020-12-30T04:03:51+5:30
औरंगाबाद : इंग्लंडहून आलेल्या नागरिकांना आता महापालिका सात दिवस सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार ...
औरंगाबाद : इंग्लंडहून आलेल्या नागरिकांना आता महापालिका सात दिवस सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था मनपाकडून एमसीईडीच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना हॉटेलचे शुल्क आकारुन ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने विदेशातून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांनी तातडीने बैठक घेवून यासंदर्भात मनपाला सूचना केल्या आहेत. महापालिकेने नागरिकांना थेट घरी जावू न देता सात दिवस क्वारंटाईन् करण्याची व्यवस्था केली आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील एमटीडीसीच्या वसतिगृहात क्वारंटाईन नागरिकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांनी हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना हॉटेलचे शुल्क आकारुन ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. पाचव्या दिवशी या नागरिकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येईल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी सोडले जाईल. मात्र, घरातही १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.
चौकट..
२९ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह
इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत ४७ नागरिक इंग्लंडसह इतर देशांतून शहरात आले आहेत. त्यापैकी एक महिला व एक तरुण असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. २९ नागरिकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ज्या पाच नागरिकांचा शोध लागत नव्हता त्यांचाही शोध लागला आहे. त्यातील दोघेजण शहरातील असून दोघेजण जिल्ह्याबाहेर गेले तर एक जण विदेशात गेला आहे. तसेच सहा नागरिक परत ब्रिटनला गेले असून पाच जण बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.