चिल्लार वस्तीवरील नागरिकांना पंचवीस वर्षांपासून विजेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:31+5:302021-07-07T04:04:31+5:30
केळगाव : शिवारातील चिल्लार वस्तीवरील नागरिकांना मागील पंचवीस वर्षांपासून विजेची प्रतीक्षा आहे. अनेक वेळा निवेदन देऊन देखील महावितरणने यांच्याकडे ...
केळगाव : शिवारातील चिल्लार वस्तीवरील नागरिकांना मागील पंचवीस वर्षांपासून विजेची प्रतीक्षा आहे. अनेक वेळा निवेदन देऊन देखील महावितरणने यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, तर लोकप्रतिनिधींची उदासीनता देखील याला कारणीभूत असून येथील नागरिकांना विनाकारण अंधाराचा सामना करावा लागत आहे.
केळगाव शिवारात १९९५ पासून चिल्लार वस्ती निर्माण झाली. या ठिकाणी मच्छिंद्र मुळे, कल्याण मुळे, गोपीनाथ मुळे, श्रीराम मुळे, सुरेश मुळे, कृष्णा मुळे, जगन मुळे, पंढरीनाथ मुळे, विठ्ठल गोंगे, सोमनाथ मुळे, दत्तू मुळे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह अनेक कुटुंबे राहतात. शेतवस्तीवर वीजपुरवठा केला जाईल, यासाठी अनेक वेळा नागरिकांनी महावितरणकडे मागणी केली. लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्या उदासीनतेमुळे येथील नागरिकांच्या आयुष्यातील अंधार काही केल्या संपला नाही. महावितरणच्या सौभाग्य योजनेंतर्गत तरी आमचे भाग्य बदलेल का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून केला जात आहे.
हिंस्त्र प्राण्यांची भीती
चिल्लार वस्तीला चारही बाजूने डोंगराळ भागाने वेढलेले आहे. त्यामुळे या गावात कायमच जंगलातील हिंस्त्र प्राण्यांची भीती असते. त्यात नागरिकांना जीवाचे रान करून बॅटरी, दिवे लावून रात्र काढावी लागते. येथील विद्यार्थ्यांना रात्रीचा अभ्यास करणे अवघड झाले आहे. रात्र होण्यापूर्वीच महिलांना स्वयंपाक करावा लागतो.
----
प्रतिक्रिया...
मी या वस्तीवर सुमारे पंचवीस वर्षांपासून राहतो. परंतु अद्यापही आमच्या वस्तीवर वीजजोडणी झाली नाही. एक पिढी संपून जाण्याची वेळ आली तरी आम्ही अंधारातच आहोत. सरकारने आमची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
- ज्ञानेश्वर मोरे, ज्येष्ठ नागरिक.
---
माझे वय अडुसष्ट वर्षी असून मागील पंचवीस वर्षांपासून मी या ठिकाणी राहत आहे. संपूर्ण आयुष्य अंधारमय वस्तीत जाते की काय, विजेचा लख्ख प्रकाश आमच्या डोळ्यांनी तरी घरात पाहता येईल की नाही, असा प्रश्न पडला.
- चिंधाबाई मुळे, ज्येष्ठ महिला.
--
संभाजी ब्रिगेडच्या वतीने सिल्लोड येथील महावितरण कार्यालयातील अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे.
----
फोटो :
050721\img-20210705-wa0196_1.jpg
चिल्लार वस्तीवरील घरे वीजेकनेक्शन अभावी दिसून येत आहे.