मनपात नागरिक कमी दलाल जास्त येतात; त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 07:19 PM2018-09-26T19:19:06+5:302018-09-26T19:20:38+5:30
काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
औरंगाबाद : महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही. काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कचरा प्रश्न, समांतर, स्मार्ट सिटी आदी असंख्य प्रश्न हाताळण्यात वेळ गेला. यापुढे मी मुख्यालयातच जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिका आयुक्त कार्यालयात थांबत नसल्याची नगरसेवकांसह सर्वसामान्यांचीही तक्रार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी तर आयुक्त दाखवा, एक हजार रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर केली होती. असे का होत आहे, असा थेट प्रश्न आयुक्त डॉ. निपुण यांना विचारण्यात आला. आयुक्त म्हणाले की, नगरसेवक गायकवाड यांनी जाहीर केलेले बक्षीस दिले का? असा उलट प्रश्न आयुक्तांनी केला. महापालिकेत येणाºया नागरिकांची संख्या ठराविक आहे. त्यात काही दलालही असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. नागरिकांनी मला भेटण्याऐवजी मी त्यांच्यात जाऊन चर्चा करतो. गेल्या काही दिवसांपासून कचरा, पाणी प्रश्न सोडविण्याच्या कामात व्यस्त होतो.
उधळपट्टी थांबवावी लागेल
महापालिकेचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी मालमत्ता कर, नगररचना, मालमत्ता विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. त्यासाठी काही कठोर निर्णयही वेळप्रसंगी घ्यावे लागतील. लेखा विभागाला दायित्व, त्यामध्ये सुरू असलेली कामे, झालेली कामे असे वर्गीकरण करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले.