‘आपला दवाखाना’ वाटतोय नागरिकांनाच परका! काही दवाखाने स्थलांतरित करण्याची नामुष्की
By विजय सरवदे | Published: June 21, 2023 04:40 PM2023-06-21T16:40:46+5:302023-06-21T16:42:27+5:30
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करीत शिंदे सरकारने महाराष्ट्रदिनी ‘आपला दवाखाना’ ही योजना राज्यभरात सुरू केली खरी; पण, औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना अद्याप ती पचनी पडलेली दिसत नाही. आपल्या परिसरात हा दवाखाना नको, या मानसिकतेतून नागरिकांचा विरोध होत असल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागावर काही दवाखाने स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तत्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली. पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. सत्तांतरानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला गती दिली. १ मे २०२३ रोजी राज्यात हे दवाखाने सुरू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात २९ दवाखाने सुरू करण्यास मान्यता मिळाली. यात तालुक्याच्या ठिकाणी १५, मनपा हद्दीत १२ आणि छावणी परिसरात २ दवाखान्यांचा समावेश आहे.
मात्र, दीड- पावणेदोन महिन्यांत या योजनेने फारसी गती घेतलेली दिसत नाही. आतापर्यंत ९ तालुक्यांत १५ पैकी फक्त ७ दवाखाने सुरू झाले आहेत. कन्नड आणि वैजापूर तालुक्यात नगरपरिषदेच्या समाजमंदिरात सुरू झालेल्या या दवाखान्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे हे दवाखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाकडून इमारतीसाठी भाडेदर ठरवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी नगरपरिषद, नगरपंचायत मालकीच्या इमारतींची दुरुस्ती झाल्यानंतर तिथे हे दवाखाने सुरू होतील. फुलंब्री व सोयगाव येथे शनिवारी हे दवाखाने सुरू होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.
या आहेत सुविधा
दुपारी २ ते रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात येते. तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहेत. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा- सल्ला उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यात दवाखान्यांची स्थिती
तालुका- सुरू झाले- प्रतीक्षेत
कन्नड- ०१- ०२
वैजापूर- ०१- ०२
सिल्लोड- ०२ - ००
पैठण- ०१- ०१
गंगापूर- ०१- ०१
सोयगाव- ००- ०१
खुलताबाद- ०१- ००
फुलंब्री- ००- ०१