नागरिकांनो आता ‘स्तर’ खालावू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:58+5:302021-06-09T04:05:58+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहराचा आणि जिल्ह्याचा ‘स्तर’ खालावू नये, यासाठी सर्वांनी शिस्तीत आणि नियमानुकूल दैनंदिन ...
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहराचा आणि जिल्ह्याचा ‘स्तर’ खालावू नये, यासाठी सर्वांनी शिस्तीत आणि नियमानुकूल दैनंदिन व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी केले.
ग्रामीणचा स्तर तीनवरून एक करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून ग्रामीण भागातील सर्व तपासणी नाके सशक्तपणे कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सचा आढावा जिल्हा प्रशासन दर गुरुवारी घेणार आहे. निर्बंध शिथिलतेमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी आरटीपीसीआर चाचणी, लसीकरण अधिक करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोना आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी मनपाने जनजागृतीवर भर द्यावा. जिल्ह्यात व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. सात दिवसानंतर सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्यासह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी.
ग्रामीण भागात ५०० गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत. या अॅक्टिव्ह गावांच्या संख्येत घट व्हावी. यासाठी ग्रामीण भागात अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागाच्या हद्दीत शहराप्रमाणेच तपासणी नाके कार्यान्वित असतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले म्हणाले.
शहर अबाधितपणे स्तर एकवर राहावे
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा. शहर सध्या स्तर एकवर आहे. ते अबाधितपणे एकवर राहावे ,यासाठी लोकांनीच स्वयंशिस्त पाळावी. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा.
कोरोना टेस्टिंग किट मुबलक प्रमाणात
शहरात घाटीत दररोज जवळपास साडेतीन हजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील प्रयोगशाळेत जवळपास अडीच हजार आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मोबाईल व्हॅनद्वारे साधारणत: अडीच ते तीन हजार अशा जवळपास साडेआठ हजार चाचण्यांची जिल्ह्यातील क्षमता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा. कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी प्रशासनामार्फत दर गुरुवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्यात येतील.