मुकुंदवाडीतील दारू दुकानांविरुद्ध नागरिकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:43 PM2019-03-04T22:43:28+5:302019-03-04T22:44:07+5:30
मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनीतील (वॉर्ड क्रमांक ८४) देशी-विदेशी दारूची दुकाने आणि बीअर बारविरुद्ध परिसरातील नागरिक आणि महिलांनी एल्गार पुकारला आहे. वॉर्डातील महिलांनी दोन दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
औरंगाबाद : मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनीतील (वॉर्ड क्रमांक ८४) देशी-विदेशी दारूची दुकाने आणि बीअर बारविरुद्ध परिसरातील नागरिक आणि महिलांनी एल्गार पुकारला आहे. वॉर्डातील महिलांनी दोन दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
मुकुंदवाडी येथील भाजीमंडीमध्ये देशी-विदेशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपी, बीअर बार आहेत. या दारू दुकानांमुळे परिसरातील मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंडीत भाजी खरेदीसाठी येणाऱ्या महिला, मुलींकडे मद्यपी वाईट नजरेने पाहतात. नागरिकांच्या खिशातील पैसे काढून घेतात. गोंधळ घालतात. या दारू दुकानांचा सामान्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वॉर्डातील दारू दुकाने बंद करावीत, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केले आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दारू दुकान बंद अथवा वॉर्डातून स्थलांतरित करण्यासाठी महिलांचे मतदान घ्यावे लागते. हे मतदान घेण्यासाठी वॉर्डातील २५ टक्के महिलांच्या सह्यांचा अर्ज शासनाला प्राप्त होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नगरसेवक भाऊसाहेब जगताप, मोहन साळवे, सुनील जगताप आणि अन्य नागरिकांनी एकत्र येऊन वॉर्डात महिलांच्या सह्यांची मोहीम सुरू केली. रविवारी मुकुंदवाडीत, तर सोमवारी संजयनगरमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.