महिलेची छेड काढणाऱ्या क्लिनरला नागरिकांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:13 PM2019-07-22T22:13:06+5:302019-07-22T22:13:15+5:30
प्रात:विधीसाठी जाणा-या महिलेला पाहून तिची छेड काढणा-या देवराज या ट्रक क्लिनरला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
वाळूज महानगर : प्रात:विधीसाठी जाणा-या महिलेला पाहून तिची छेड काढणा-या देवराज या ट्रक क्लिनरला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी एएस क्लब-पैठण लिंकरोडवर घडली.
पीडित महिलेचा पती हा पैठण लिंकरोडवरील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो कुटुंबासह कंपनीतच रहातो. सोमवारी सकाळी ४५ वर्षीय पीडित महिला ही प्रात:विधीसाठी नातवासह रस्त्यालगतच्या शेतात जात होती.
दरम्यान, पश्चिम बंगाल येथून रेशनचा तांदुळ घेवून श्रीरामपूर येथे जाणारा ट्रक (डब्ल्युबी-२३, ई-१५५५) एएस क्लब ते पैठण लिंकरोडवरील पुलाजवळ बंद पडला. त्यामुळे चालक दीप दास मेंटू दास दुरुस्तीचे सामान आण्यासाठी शहरात गेला. तर क्लिनर देवराज (२५) हा ट्रकजवळच थांबला होता. महिला एकटी दिसताच देवराज याने तिची छेड काढली.
रस्त्यावरील नागरिकांनी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून देवराजने तेथून पळ काढला. नागरिकांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान चालक दीपदास हा शहरातून सामान घेवून ट्रकजवळ आला. जमावाने दीपदासलाच पकडले. परंतू हे दुष्कृत्य करणारा चालक नसून क्लिनर देवराज असल्याचे समजताच जमावाने देवराजला ट्रकच्या बाहेर ओढून चोप दिला.
सदरील घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी देवराजला सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले.