दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:42 PM2019-05-25T22:42:25+5:302019-05-25T22:42:42+5:30
महिना ते दीड महिन्यापासून सिडको वाळूज महानगराला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
वाळूज महानगर : महिना ते दीड महिन्यापासून सिडको वाळूज महानगराला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पिण्यासह आंघोळीसाठी हेच पाणी वापरावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, पोटदुखी, मळमळ, गॅस्ट्रो आदींसह त्वचेचे आजार बळावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडको वाळूज महानगरातील नागरी वसाहतीला आठ ते दहा दिवसांतून एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिडको प्रशासनाकडे जलशुद्धीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.
एमआयडीसीकडून मिळते तेच पाणी नागरी वसाहतीला पुरविले जाते. शिवाय सिडकोच्या अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी वॉल्व्हला गळती लागली आहे. गळतीमुळे साचलेल्या पाण्यात डुकरे व कुत्रे बसत असून हेच घाण पाणी पुन्हा जलवाहिनीच्या पाण्यात मिसळत आहे.
त्यामुळे एमआयजी, एलआयजी भागासह द्वारकानगरी, स्वामी विवेकानंदनगर, सारा गौरव, साई रेजेन्सी, साक्षीनगरी, सूर्यवंशीनगर, सारा ईलाइट, राजर्षी शाहुनगर, स्वामी समर्थ हौ. सो., साई सहवास हौ.सो. आदी नागरी वसाहत भागातील नळाला दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. याविषयी अनेकवेळा तक्रारी करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
दूषित पाण्यामुळे साथीचे आजाराची लागण होत असल्याने नागरिकांना आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे या पाण्यामुळे अंगाला खाज येणे, अंगावर फोड येणे आदी त्वचेचे आजार बळावले आहेत. प्रशासनाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
या संदर्भात सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, सिडकोकडे पाणी शुद्ध करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने एमआयडीसीला तसे पत्रही दिले आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.