नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा
By विजय सरवदे | Published: August 11, 2023 03:43 PM2023-08-11T15:43:47+5:302023-08-11T15:44:03+5:30
देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे, या अभियानामागचा उद्देश आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना घर, कार्यालये आणि शाळांच्या इमारतींवर तिरंगा ध्वज फडकावण्याचे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता.
यावेळी फक्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज फडकावण्याचे जि.प. प्रशासनाने आवाहन केले आहे. यासाठी ज्या कुटुंबाची क्षमता नसेल, त्यांना ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून झेंड्यांचा पुरवठा करू शकते. यासाठी प्रशासनाकडून निधी तरतूद करण्यात आलेली नाही, असे जि.प. प्रशासनाने कळविले आहे.
या नियमांचे पालन करा
ध्वजारोहण करताना तिरंग्याचा सन्मान राखावा. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये. तिरंगा ध्वज उलटा फडकला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वर असावा. राष्ट्रध्वज झुकलेला नसावा, याशिवाय तिरंगा ध्वजाच्या आजूबाजूला इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने नसावा. ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका.