औरंगाबादकरांचा पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:27 AM2018-05-05T00:27:49+5:302018-05-05T00:28:27+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असताना महापालिकेने अनेक वॉर्डांतील पाणीपुरवठा चक्क एका दिवसाने पुढे ढकलला आहे. अनेक वसाहतींना ऐन उन्हाळ्यात सहा आणि सात दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असताना महापालिकेने अनेक वॉर्डांतील पाणीपुरवठा चक्क एका दिवसाने पुढे ढकलला आहे. अनेक वसाहतींना ऐन उन्हाळ्यात सहा आणि सात दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
शुक्रवारी महापालिका मुख्यालयासह पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे पाणी आले नसल्याच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या. पालिकेच्या या ‘जालीम’ धोरणाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारी सकाळीच सिडको एन-५ पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलनही करण्यात आले. मागील काही दिवसांपासून महापालिकेने पाणीपुरवठ्याचा अक्षरश: पोरखेळ लावला असून, मनात येईल त्याप्रमाणे प्रयोग करण्यात येत आहेत. जायकवाडीतून समाधानकारक पाणी येत असतानाही शहरात फक्त नियोजन नसल्याने पाणीपुरवठ्याची वाट लागली आहे. शुक्रवारी दिवसभर नागरिक महापालिका मुख्यालयात दूरध्वनीवर पाणी आले नसल्याची तक्रार करीत होते. पाणीपुरवठा विभागातील बहुतांश अधिकाºयांचे मोबाईल बंद होते. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहेल यांना दिवसभर तक्रारींचा निपटारा करावा लागला. नगरसेविका राखी देसरडा यांच्या वॉर्डात आज पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्याचप्रमाणे बालाजीनगर, भानुदासनगर, पदमपुरा, आकाशवाणी, सिडको एन-५, एन-६ परिसर, टी.व्ही. सेंटर आदी अनेक भागात पाणीच आले नाही. ज्या ठिकाणी पाणी आले ते अपुरे होते. कडक उन्हात पाण्यासाठी कुठे भटकंती करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
टाकीवर जोरदार आंदोलन
गुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांना चौैथ्या दिवशीही पाणी न आल्याने सकाळी ६ वाजताच संतप्त नागरिक सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर पोहोचले. त्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला. स्वत: व्हॉल्व्ह फिरवून नागरिकांनी पाणी सोडले. नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या नेतृत्वाखाली दीडशे ते दोनशे नागरिकांनी हे आंदोलन केले. यावेळी एकही अधिकारी हजर नव्हता. कार्यालयाला कुलूप होते तर टँकरचालक टँकर भरून पाणी घेऊन जात होते. त्यामुळे नागरिकांनी टँकरचे पाणी बंद करून त्यांना हुसकावून लावले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी आजच पाणी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. नागरिक तीन तास ठाण मांडून बसले. उपअभियंता पदमे यांनी आज पाणी देणे शक्य नाही, असे सांगितले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी स्वत:च वॉल्व्ह फिरवून कॉलनीला पाणीपुरवठा केला.
आज बैठकीचे आयोजन
शहरातील पाणीपुरवठ्यावर यापूर्वी सर्वसाधारण सभेत पाच तास मंथन झाले. तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा, असे आदेश सभागृहाने दिले. त्यानंतर पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झाली नाही. उलट पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू झाली आहे. शनिवारी सायंकाळी महापौरांनी पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वसाधारण सभा संपल्यावर ही बैठक होईल.