छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 5, 2024 12:16 PM2024-07-05T12:16:45+5:302024-07-05T12:18:05+5:30
मध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला.
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही शहराचा विकास व तेथील नागरिकांची सुबत्ता तपासायची असेल तर आर्थिक कुंडली बघणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने छत्रपती संभाजीनगरची आर्थिक कुंडली तयार केली आहे. यात जिल्ह्यात आजघडीला सर्व प्रकारच्या ३८ बँका असून, त्यांच्या ५०७ शाखा आहेत. मागील वर्षभरात बँकांच्या ठेवीत ६ हजार ५३२ कोटींची वाढ होऊन ५० हजार कोटींचा आकडा पार केला आहे. बँकेत ठेवी ठेवण्याचा हा उच्चांक ठरला आहे.
कशा वाढत गेल्या ठेवी व कर्जवाटप
किती बँका---- मार्च २०२२-- मार्च २०२३---- मार्च २०२४
१) बँकेत ठेवी : ३९ हजार ५४६ कोटी---४३ हजार ९१६ कोटी--- ५० हजार ४४८ कोटी
२) कर्जवाटप : २९ हजार ५४६ कोटी--- ३४ हजार ९१६ कोटी--- ४३ हजार ५६१ कोटी
जिल्ह्यात ३८ बँकांच्या ५०७ शाखा
बँक संख्या एकूण (शाखा)
१) राष्ट्रीयीकृत १२ ----- १९९
२) खासगी १५----१०२
३) स्माॅल फायनान्स बँक ८---२७
४) पेमेंट बँक ०१---२
५) महाराष्ट्र ग्रामीण बँक ०१ --- ३९
६) डीसीसी बँक ०१--- १३८
बँकेच्या शाखा वाढल्या एटीएमची संख्या घटली
शाखा----मार्च २२---मार्च २३---- मार्च २४
बँकेच्या शाखा- ४७२--- ४८८--- ५०७
एटीएम-- ६७२--- ६८१--- ६६२
यूपीआयने एटीएमवर परिणाम
डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ६० टक्केपेक्षा अधिक ग्राहक यूपीआयने पेमेंट करीत आहेत. यामुळे एटीएममधून रक्कम काढणाऱ्यांची संख्या कमालीची घटत आहे. रोखेचे व्यवहार कमी होत असल्याने बँकांसाठी एटीएम म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे झाले आहे. म्हणून तर जिल्ह्यात मागील वर्षभरात १९ एटीएमला कुलूप लावण्यात आले.
राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा वाढला
मध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला. परिणामी आजघडीला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकूण ठेवी ३० हजार २६८ कोटींवर जाऊन पोहोचल्या. खासगी बँकेच्या एकूण ठेवी १४ हजार ६२ कोटींवर गेल्या आहेत.
बँकांच्या शाखा वाढीला मोठा वाव
ग्रामीण भागातून अर्ध शहरी व शहरी भागात नागरिकांचे स्थलांतर वाढत आहे. शहरालगतच्या ५० किमी अंतरावर पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७७०० लोकसंख्येमागे एक बँक आहे. यामुळे बँकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यादृष्टीने बँकांची शाखा वाढत आहे. काही बँकांनी शाखा विस्तारासाठी प्रस्ताव पाठविले आहेत.
-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक