नागरिकांनो इकडे लक्ष द्या, मालमत्ता करावरील व्याजाला यंदाही माफी नाही
By मुजीब देवणीकर | Published: October 18, 2023 12:38 PM2023-10-18T12:38:18+5:302023-10-18T12:38:34+5:30
सोलार यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांनाही सूट बंद
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कराच्या थकबाकीवर मनपाकडून दरवर्षी २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करण्यात येते. यापूर्वी अनेकदा वसुली व्हावी म्हणून व्याजात ७५ टक्के सूट दिली जात होती. यंदा कोणतीही सूट दिली जाणार नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांना सेवाकरात सूट मिळत होती. ही सुद्धा बंद करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. वसुलीसाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ नंतर मालमत्ताधारकांच्या घरी जा, अशी सूचनाही त्यांनी केली.
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासक दररोज झोननिहाय आढावा घेत आहेत. कर निरीक्षक, वसुली कर्मचाऱ्यांसोबत ते संवाद साधत आहेत. मंगळवारी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यंदाही थकबाकीवर कोणतीही सूट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग १ मध्ये १२३ व प्रभाग ८ मध्ये ९६ मालमत्ताधारकांकडे मोठी थकबाकी असल्याची अशी प्रकरणे सादर करण्यात आली. २१९ प्रकरणात जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्त मालमत्तांचा लिलाव करून त्या विक्री करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वसुलीचे काम शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सुटी देण्याचे निर्देश प्रशासकांनी दिल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
घरमालकाकडून वसुली करावी
सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करा, एका मालमत्तेची दोन ठिकाणी नोंदणी असेल तर ती प्रकरणे महिनाभरात मार्गी लावा. मोबाइल टाॅवर सील केलेले असेल तर सीलची शहानिशा करा, मीटरची तपासणी करावी, टॉवर सुरू होते, तोपर्यंतचा कर संबंधित घरमालकाकडून वसूल करा, सर्वसामान्य मालमत्ताधारकांचा मोबाइल क्रमांक, संपूर्ण नाव याच्या नोंदी अपडेट करा, अशा सूचना प्रशासकांनी केल्या.
८६ कोटींची वसुली
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात २५० कोटी नियमित मालमत्ता कर, १०० कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. पाणीपट्टीतून १३० कोटी रुपये तिजोरीत येतील, अशी अपेक्षा आहे. १ मे ते १६ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ता करातून ७१.७ तर पाणीपट्टीतून १२.३९ कोटी रु. मिळाले.
झोननिहाय मालमत्ता कराची वसुली
झोन- वसुली (कोटीत)
०१--५.३९
०२--६.०६
०३--२.०१
०४--६.४८
०५--१८.२२
०६--५.७३
०७--११.९०
०८--१२.६८
०९--९-६०