छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने
By मुजीब देवणीकर | Published: April 15, 2023 07:56 PM2023-04-15T19:56:52+5:302023-04-15T19:57:16+5:30
स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडून झोननिहाय मोहीम राबविण्यात येते. एप्रिल महिना सुरू झाला तरी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गापासून मनपाने पॅचवर्कच काम केलेले नाही.
स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची योजना अत्यंत फसवी असल्याचे निदर्शनास येत आहे. दीड वर्षात ३० रस्तेही तयार झाले नाहीत. उर्वरित रस्ते होण्याची शक्यताही कमीच आहे. निधी, दरवाढ इत्यादी मुद्द्यांवर ही कामे रखडली आहेत. त्याचप्रमाणे १०० कोटी रुपये खर्च करून मनपा रस्ते करणार असे सांगितले. निविदाही काढली. अजून वर्कऑर्डर नाही. भविष्यात रस्त्याची ही कामे होणार म्हणून मनपा साधे पॅचवर्क ही करायला तयार नाही. मागील दोन वर्षांमध्ये तर निव्वळ मुरूम माती टाकून खड्डे बुजविण्यात आले. सध्या ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात खरेदीसाठी अलोट गर्दी झाली आहे. पादचारी, वाहनधारकांना जुन्या शहरातील खड्ड्यांचा बराच त्रास सहन करावा लागतोय.
दीड महिना शिल्लक
पावसाळ्यात डांबरी पॅचवर्कची कामे करता येत नाहीत. मनपाकडे सध्या दीड महिनाच शिल्लक आहे. मे अखेरपर्यंत ही कामे करावी लागणार आहेत.
पॅचवर्कचे नियोजन सुरू
मागील वर्षी झोननिहाय पॅचवर्कसाठी आर्थिक नियोजन केले होते. कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेला अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काम झाले नाही. सध्या तीन झोनसाठी कंत्राटदार उत्सुक आहेत. लवकरच पॅचवर्कची कामे होतील. - ए. बी. देशमुख, शहर अभियंता
कोणते रस्ते सर्वाधिक खराब ?
मनपा मुख्यालय ते रोशन गेट
पैठण गेट ते गुलमंडी
शहा बाजार ते चंपा चौक
शहागंज ते जुना बाजार
महात्मा फुले पुतळा ते नेहरू भवन
हर्षनगर ते मंजूरपुरा सिटी चौक ते नौबत दरवाजा