नागरिकांनो, मोबाइल सांभाळा; तीन महिन्यांत लुटीचा रेकॉर्ड ब्रेक, तरी पोलिसांना चोर सापडेना
By सुमित डोळे | Published: November 10, 2023 06:33 PM2023-11-10T18:33:55+5:302023-11-10T18:34:42+5:30
९७ मोबाइल लुटीच्या घटना, तर ७०० पेक्षा अधिक गहाळ झाल्याची नोंद; तरी पोलिसांना चोर सापडेना
छत्रपती संभाजीनगर : मंगळसूत्र चोरीसह पायी जाणाऱ्या नागरिकांचे कॉलवर बोलताना, हातातील मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाही. ट्रिपल सीट दुचाकीस्वारांच्या टोळ्याच यात सक्रिय झाल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एसएससी बोर्डासमोर अवघ्या १० मिनिटांमध्ये एका रांगेत दुचाकीस्वार चोरांनी तिघांना याच पद्धतीने लूटले. रात्री १० ते १०:१५ दरम्यान पदमपुरा ते एसएससी बोर्डादरम्यान या घटना घडल्या. गेल्या ९० दिवसांमध्ये ९७ मोबाइल लुटले गेले, तरी पोलिसांना यातील चोर सापडले नाहीत.
पदमपुऱ्यातील व्यावसायिक ललित बन्सवाल (३३) हे ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता एसएससी बोर्ड ते रेल्वेस्थानक रस्त्याने पायी जात होते. अग्निशमन विभागाच्या कार्यालयासमोरून जात असताना काळ्या रंगाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून आलेल्या ट्रिपल सीट चोरांनी त्यांच्याजवळ जात वेग कमी केला व हातातील मोबाइल हिसकावून नेला. अशाच प्रकारे पुढे काही अंतरावर रोहित औटी (१९), अजय राऊत (२३) यांचाही मोबाइल हिसकावून नेले. घटनेनंतर तिघांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या तीन महिन्यांमध्ये मोबाइल हिसकावून नेलेल्या ९७ घटनांची नोंद आहे. तर ७४४ मोबाइल गहाळ झाल्याची नोंद आहे. यातील जवळपास ७० टक्के मोबाइल चोरी, लूटले गेलेलेच असतात. मात्र, ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे टाळून गहाळ झाल्याची नोंद केली जाते. त्यामुळे असे एकूण ९००च्या आसपास मोबाइल अवघ्या ९० दिवसांत लूटले गेले आहेत.
एक चोर सापडला, तोही नागरिकामुळे
२ नोव्हेंबर राेजी बजाज रुग्णालयासमोर रुग्णाच्या नातेवाइकाचा ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनीच मोबाइल हिसकावून नेला. मात्र, तानाजी चव्हाण यांनी पाठलाग करून तिघांपैकी सुशांत भालेराव (रा. सिंधीबन) याला पकडले. उर्वरित एकाही घटनेत स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेला या टोळ्या पकडता आलेल्या नाही. बहुतांश घटना कॅनॉट प्लेस, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, एन-१, एन-४, क्रांतीचौक, उस्मानपुरा, सातारा, वाळूज औद्योगिक वसाहतीत घडल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्व घटनांमध्ये चोर ट्रिपल सीट असतात. मोपेड दुचाकीचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे रस्त्याने पायी जाताना कॉलवर बोलणे, हातात मोबाइल ठेवणेही शहरात नागरिकांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहे.